Pune Crime News: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची (Pune Crime News) धक्कादायक घटना समोर आली होती. पंढरपूरकडे (Pandharpur) जाणाऱ्या वारकऱ्यांना (Warkari) अडवून लुटले. तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची भयावह घटना घडली. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी महत्वाची माहिती दिली आहे.
पंढरपूरकडे जाताना वारकरी वाटेत चहासाठी थांबले होते. त्यानंतर गाडीत बसताना दोन जण गाडीवरून आले. त्यांनी या कुटुंबाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून कोयत्याचा धाक दाखवला आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या घटनेमुळे दौंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलीस अज्ञातांचा शोध घेत असून या आरोपींना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
वारीच्या वाटेवर नेमकं काय घडलं?
पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीपसिंह गिल यांनी सदर घटनेची माहिती दिली. सदर कुटुंब पंढरपूरला निघालं होतं. यावेळी ड्रायव्हरला चहा प्यायची असल्याने दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे गाडी थांबवण्यात आली. यावेळी दोन तरुण मोटरसायकलवरुन आले आणि त्यांनी सगळ्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून सोनं लुटलं. कोयत्याचा धाग दाखवत आरोपींनी कुटुंबाला धमकी दिली आणि त्यांच्याकडील सर्व दागिने घेतले. तसेच त्यांच्यासोबत असणाऱ्या 17 वर्षीय मुलीचं लैंगिक शोषण देखील केलं, असं संदीपसिंह गिल यांनी सांगितले.
आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची राहुल कुल मागणी-
पंढरपूर वारीसाठी व देवदर्शनासाठी निघालेल्या पुणे जिल्ह्यातील वारकरी भजनमंडळींवर स्वामी चिंचोली, ता. दौंड परिसरात सोमवारी (दि. 30 जून 2025) पहाटेच्या सुमारास भीषण हल्ला झाला. दोन अज्ञात युवकांनी कोयत्याचा धाक दाखवून, डोळ्यात मिरची पूड फेकून महिलांच्या अंगावरील सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटले. यासोबतच, त्यांच्या समवेत असलेल्या अल्पवयीन मुलीला बाजूला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर, दौंडचे आमदार राहुल कुल यांनी महाराष्ट्र विधानसभेत या घटनेचा तीव्र निषेध केला. त्यांनी मागणी केली की, "संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, त्यांच्या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि या घटनेतील पीडितांना त्वरित न्याय मिळावा यासाठी खटला जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयात चालवावा." तसेच, दौंड तालुक्यातील पोलिसांची संख्या अपुरी असल्याने, दौंड व यवत या दोन पोलीस स्टेशनचे विभाजन करून पाटस येथे नवीन पोलीस स्टेशन मंजूर करावे आणि आवश्यक मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी आमदार राहुल कुल यांनी केली आहे.