पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यासह तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. एवढंच नाहीतर गौतम पाषाणकर यांच्यावर मारहाणीचाही आरोप करण्यात आला आहे. फ्लॅटसाठी दोन कोटी 40 लाख रुपये घेऊनसुद्धा फ्लॅट नावावर केला नाही, याप्रकरणी जाब विचारल्यानंतर कार्यालयात बोलावून मारहाण केली अशी फिर्याद तक्रारदारानं शिवाजीनगर पोलीस स्थानकात केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गौतम पाषाणकर यांच्यासह रिनल पाषाणकर आणि दीप पुरोहित यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
पुण्यातील मोठ्या उद्योजकांच्या यादीत गौतम पाषाणकरांचं नाव आघाडीवर असतं. काही दिवसांपूर्वी पुण्यातून बेपत्ता झाल्यामुळं गौतम पाषाणकर चर्चेत आले होते. त्यांच्या घरी एक चिठ्ठीही ठेवली होती. जवळपास 20 ते 25 दिवसांनी पोलिसांनी बाहेरच्या राज्यातून त्यांना ताब्यात घेतलं आणि पुन्हा पुण्यात आणलं होतं. याप्रकरणानंतर गौतम पाषाणकर पुन्हा चर्चेत आले आहेत, ते फसवणूक केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामुळं.
गौतम पाषाणकर यांच्याविरोधात पसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. एका 43 वर्षीय व्यक्तीनं ही तक्रार दिली आहे. तक्रारदार व्यवसायिक आहेत. त्यांना फ्लॅट घ्यायचा होता. यादरम्यान गौतम पाषाणकर यांनी आर्थिक फायदा व्हावा, यासाठी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना खरडीत सुरु असलेल्या मे. प्रोक्सिमा क्रिएशन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या बहुमजली बांधकाम इमारतीमधील दोन फ्लॅट दिले. या फ्लॅटचा व्यवहार ठरला आणि करारनामा देखील झाला केला. 2 कोटी 87 लाख रुपयांना या दोन फ्लॅटचा व्यवहार ठरला होता. त्यांनी 2 कोटी 40 लाख रुपये घेतले. मात्र, फ्लॅटचा ताबा आणि नोंदणीकृत दस्तावेज तयार केले नाही. तर फ्लॅटचे खरेदीखत देखील त्यांच्या नावावर केलं नाही. हे दोन्ही फ्लॅट दुसऱ्याच दोन व्यक्तींच्या नावावर केले.
सर्व बाबी लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी याबाबत पाषाणकरांकडे विचारपूस केली. त्यावेळी गौतम पाषाणकर यांनी जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या ऑफिसमध्ये त्यांना बोलावलं. तक्रारदार तिथे गेल्यानंतर आरोपी आणि त्यांच्या नोकरांनी त्यांना बेदम मारहाण केली, असा दावा तक्रारदारांनी केला आहे. या मारहाणीत पायही फ्रॅक्चर झाल्याचं तक्रारदारांनी सांगितलं.