Pune Crime: नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यभारातून संतापाची लाट उसळली असताना पुण्यातून आणखी एका पाखंडी बाबाचा उद्योग समोर आलाय. मी महादेवाचा अवतार असं सांगत महिलेवर अत्याचार करणाऱ्या या स्वयंघोषित धर्मगुरु म्हणवणाऱ्या ऋषिकेश वैद्य याला पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी परिसरातून ही कारवाई करण्यात आली. महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली त्याच्याविरोधात पुण्यातील मांजरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Pune Crime News)
नेमके प्रकरण काय? Pune Crime
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणाची सुरुवात वसई येथे झाली होती. तेथील गुन्हा पुढील तपासासाठी पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी तपास करत पिंपरी भागातून ऋषिकेश वैद्यला ताब्यात घेतले.तो एका गाडीतून प्रवास करत त्यांच्या नातेवाईकांकडे पुण्यामध्ये येण्यासाठी निघाला होता त्याचवेळी पोलिसांना ही माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे..उद्या दुपारी ऋषिकेश वैद्य याला शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाणार आहे. पुणे पोलिसांच्या तीन ते चार टीम त्याचा शोध घेत होते अखेर काही वेळापूर्वी त्याला पोलिसांनी अटक केली आहे..
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पीडितेचा आरोपी बाबाशी पहिला संपर्क 2023 मध्ये फेसबुकद्वारे झाला.त्याच वर्षी डिसेंबरमध्ये आरोपी त्या महिलेला भेटण्यासाठी पुण्यात गेला होता. त्याने आपण महादेवाचा अवतार असून ती त्याची 'पार्वती' असल्याचा दावा केला होता. पिडीत महिलेच्या आरोपानुसार,आरोपी तिला पुण्यातील मांजरी भागातील एका लॉजमध्ये घेऊन गेला, तिला काही मादक पदार्थ दिले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने त्या महिलेचे फोटोही काढले होते. तक्रारीनंतर पोलिसांनी भोंदू बाबावर गुन्हा दाखल केला. आता ऋषिकेश वैद्य या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
अशोक खरात प्रकरणात रोज नवनवे खुलासे
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधात शुक्रवारी रात्री उशीरा दोन गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा (Sexual Assault) तर दुसरा गुन्हा हा आर्थिक फसवणुकीचा आहे. यापैकी लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात अशोक खरात याने संबंधित महिलेवर त्याच्या नेहमीच्या पद्धतीनेच म्हणजे दैवी अवतार असल्याचे सांगून आणि तांब्याच्या भांड्यातील पाणी पाजून अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पती आणि पत्नी दोघेही (Married Couple) संसारात विघ्न येत असल्याने अशोक खरात याच्याकडे गेले होते.
