Pune Crime News : वडगाव बुद्रुक (Crime) आंबेगाव येथील सिंहगड कॉलेजच्या जवळील दुकानात दहशत निर्माण करणाऱ्या कोयता गॅंगमधील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करुन त्यांना चोप दिला आहे. त्यातील एकाला अटक केली आहे. अक्षय इंगवले आणि धनंजय पाटील या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता या आरोपींना जेरबंद केलं. या दोन्ही पोलिसांच्या कामगिरीचं सध्या सगळीकडे कौतुक करण्यात येत आहे. 


पुण्यात कोयता गॅंगची दहशत सुरुच आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सिंहगड लॉ कॉलेज परिसरात दोन तरुणांनी हातात कोयते घेऊन दहशत निर्माण करण्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला होता. गेल्या काही दिवसांपासून कोयता बाळगून मध्यवर्ती भागात दहशत निर्माण करण्याचे कृत्य सर्रास सुरु असल्याचं समोर आलं. या घटनेचा व्हिडीओ समोर आला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या आरोपींचा पाठलाग करुन त्यांना अटक केली. 


चाकू सुरे घेऊन दहशत


सिंहगड लॉ कॉलेज रोडवर काल (28 डिसेंबर) दोन तरुणांनी हातात चाकू सुरे घेऊन परिसरातील दुकानांमध्ये जाऊन अनेक लोकांना भोसकले. रस्त्यात जो दिसेल त्याला चाकू दाखवून भीती दाखवली जात असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या हल्ल्यात एक जण जखमी देखील झाला होता. जखमी झालेल्या तरुणाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. 


पोलिसांनी धु-धु धुतला...


पुणे शहरात गुन्ह्यांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ही गुन्हेगारी थांबवण्यासाठी पुणे पोलिसांकडून प्रयत्न सुरु असतात. रोज अनेक गुन्हेगार पुणे पोलीस जेरबंद करतात. पुण्यात सध्या कोयता गॅंग दहशत निर्माण करताना दिसत आहे. अनेक ठिकाणी त्यांनी दहशत पसरवली आहे. दारु पिऊन कोयते घेऊन नागरिकांच्या अंगावर गेले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीसांंनी त्यांना पकडून भर रस्त्यात त्यांना चोप दिला आहे. 


दहशत रोखण्याचं पुणे पोलिसांसमोर आवाहन


कोयता गॅंगच्या दहशतीचा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यांनी या सगळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा किंवा तडीपार करा, अशी मागणी केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुणे पोलिसांनी पहारा देण्यास सुरुवात केली होती. मात्र ही गॅंग शहरातील सगळ्यात परिसरात सक्रिय झाली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांना या गॅंगवर कारवाई करण्याचं मोठं आव्हान आहे.