गडचिरोली : शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही गेल्या काही महिन्यांपासून लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. बदलापूर येथील एका शाळेत चिमकुल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर राज्यभर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. त्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले होते. मात्र, अद्यापही शाळा व कॉलेजेसमध्ये अशा घटना घडत आहेत. गडचिरोली  (Gadchiroli) जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील कुक्कामेटा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाकडून शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील मुख्याध्यापकाने  चक्क तिसरी आणि पाचवीच्या शिकणाऱ्या मुलींसोबत लैंगिक चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकरणी पोलिसांनी नराधम शिक्षकाला (Teacher) बेड्या ठोकल्या आहेत. पीडित मुलींच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीवरून लाहेरी पोलिसांनी मुख्याध्यापकास अटक केली आहे. 


रविंद्र गव्हारे असे मुख्याध्यापकाचे नाव असून मुख्याध्यापक गव्हारे हा एका-एका मुलींना रजिस्टर पाहण्याच्या बहाण्याने आपल्या कक्षात बोलवायचा आणि मुलींशी अश्लील चाळे करायचा. याबाबत कोणाला काही सांगितल्यास शाळेतून काढून टाकण्याची आणि मारण्याची धमकी देखील तो द्यायचा, असे पीडित मुलीच्या आईने दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे. त्यामुळे, मुख्याध्यापकांच्या धमकीने घाबरलेल्या मुलींनी आधी पालकांना देखील याबाबत सांगितले नाही. पण, काही मुलींनी शाळेत जाण्यास नकार दिल्यानंतर पालकांनी त्यांना विश्वासात घेऊन विचारले असता, हा प्रकार समोर आला आहे. या घटनेनं जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून मुख्याध्यापक रविंद्र गव्हारे याच्याविरूद्ध बाल लैंगिक अत्याचार आणि ॲट्रॉसिटी कलमांखाली गुन्हा दाखल करुन त्यास भामरागड पोलिसांनी अटक केली आहे.


लैंगिक अत्याचाराच्या घटनांत वाढ


दरम्यान, गडचिरोलीत गेल्याच आठवड्यात एका दिव्यांग तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. येथील शारीरिक दृष्ट्या कमकुवत असलेली 23 वर्षीय तरुणी शौचास गेली असता तिला मारहाण करून अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी 24 तासात अटक केली. पीडित तरुणीच्या जबाबानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. अनिल संतू उसेंडी (23) रा. छत्तीसगड, हल्ली मुक्काम शिवणी असं आरोपीचे नाव आहे, आरोपीने त्याचा गुन्हा कबुल केला आहे. मात्र, लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून स्वारगेटमध्ये भल्या पहाटे एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. या घनटेनंतर पुन्हा एकदा सर्वत्र संतापाची लाट उसळळी. तर, विरोधकांनी देखील या मुद्द्यावर सरकारला लक्ष्य केलं. 


हेही वाचा


''एकतर भैय्याजी जोशी चिल्लर म्हणा, नाहीतर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा''; अनाजीपंत म्हणत उद्धव ठाकरे कडाडले