Beed Crime News : बीडच्या पाटोदा येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात पाटोदा तहसील कार्यालयातून चोरट्याने चक्क संगणक लंपास (Crime News) केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून पाटोदा पोलीस (Patoda Crime News) ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. परंतु चक्क तहसील कार्यालयातूनच ही चोरी झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. सोबतच शासकीय कार्यालयही आता चोरट्यांपासून सुरक्षित नाहीये का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
चोरीचा प्रकार उघड होऊ नये यासाठी तहसील प्रशासनाचा प्रयत्न
पुढे आलेल्या माहितीनुसार, पाटोदा तहसील कार्यालयातील महसूल विभागात असणाऱ्या संगणकाची ही चोरी झाली आहे. तहसील प्रशासनाने चोरीचा प्रकार उघड होऊ नये यासाठी प्रयत्न केला. मात्र ही बाब नायब तहसीलदार गणेश दहिफळे यांच्या लक्षात येताच त्यांनी ही तक्रार नोंदवली आहे. यात चोरट्याने हा संगणक लंपास केला? की कार्यालयातूनच याची चोरी झाली. याचा तपास आता पोलीस करतायत. मात्र तहसील कार्यालयच असुरक्षित असल्याचा प्रत्यय या निमित्ताने समोर आला आहे.
जलतरण तलावात पोहण्यास गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू
बीड शहरातील एका जलतरण तलावामध्ये बुडून एका सतरा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. सतीश भीमराव कांबळे असं विद्यार्थ्याचे नाव असून तो शनिवारी दुपारच्या सुमारास जलतरण तलावामध्ये पोहण्यासाठी गेला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली.
दरम्यान ही घटना घडताच जलतरण तलाव प्रशासनाने तलाव बंद केलाय. जलतरण तलावात पोहण्यासाठी आलेल्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे. सतीश मूळचा उदगीर तालुक्यातील रहिवासी असून तो बीड मधील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. दरम्यान या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या