Pandharpur Kasegaon : देशातील तृतीयपंथी आणि जोगतीण यांचे आराध्य म्हणून ओळख असणाऱ्या कासेगाव येथील यल्लमा देवीच्या (Yellamma Devi Temple) मंदिरात पहाटे चोरी झाली. चोरांनी देवीच्या चांदीच्या मूर्ती आणि पादुकांसह जवळपास 10 लाखांचे दागिने लांबवले असल्याचे समोर आले आहे. चोरीची घटना उघड होताच एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे. या प्रकरणी चोरांना पोलिसांनी तातडीने अटक करावी अशी मागणी ग्रामस्थ आणि भाविकांनी केली आहे. या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यातील तृतीयपंथी आणि जोगतीण यांचे आराध्य देवस्थान म्हणून ओळख असणाऱ्या कासेगाव येथील यल्लम्मा देवीच्या मंदिरात आज पहाटे चोरी झाल्याने खळबळ उडाली. चोरांनी देवीची चांदीची मूर्ती, चांदीच्या पादुका, चांदीची प्रभावळ असे जवळपास 10 लाखांचे दागिने लंपास केले आहेत. या घटनेने भाविकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. पोलिसांनी तातडीने याचा तपास करून देवीचा ऐवज शोधावा अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
आज पहाटे दोन नंतर पुजाऱ्याच्या घराला बाहेरून कड्या लावण्यात आल्या आणि मागील दाराने आत येऊन चोरांनी दोन दरवाज्याची कुलुपे तोडून मंदिरात प्रवेश केला. या अज्ञात चोरांनी पहाटेच्या सुमारास ही चोरी केल्याचे पुजारी मुकुंद जाधव यांनी सांगितले. आज पहाटे पाच वाजता पुजारी मंदिरात आल्यावर त्यांना या घटनेचा उलघडा झाला. यानंतर तातडीने पुजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोचले.
गेले काही दिवसांपासून मंदिराचे सीसीटीव्ही बंद आहेत. यात्रेपूर्वी हे सीसीटीव्ही दुरुस्त करून कार्यान्वित करण्याचे ठरले होते. मात्र त्या पूर्वीच ही चोरी झाल्याने कासेगाव परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पहाटेच्या सुमारास सध्या कडाक्याची थंडी पडत असल्याने चोराने याचा फायदा घेतला. अतिशय जागृत असणाऱ्या या मंदिरात झालेल्या चोरीमुळे पोलीस खातेही खडबडून जागे झाले आहे. पोलिसांनी तपासासाठी विविध पथके तयार केले आहेत.