Osmanabad News : बुलढाणा पोलिसांनी उस्मानाबादमधील परांड्यात येऊन मोठी कामगिरी केली आहे. शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करुन फरार आरोपीला परांड्यातून ताब्यात घेतलं आहे. यावेळी आरोपीनं उकिरड्यात पुरुन ठेवलेली 42 लाख 11 हजार 920 इतकी रोकड जप्त केली आहे. पोलिसांनी परंडा तालुक्यातील बावची येथून या प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष रानमोडे यास अटक केली आहे. त्याच्याकडून रकमेसह एक कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे.  


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जादा दराने धान्य खरेदी करतो असे आमिष देऊन शेकडो शेतकऱ्यांचे 3 कोटी 41 लाख 42 हजार रुपयांचे धान्य खरेदी करून मुख्य आरोपी संतोष रानमोडे फरार झाला होता. संतोष रानमोडे हा परंडा तालुक्यातील कौडगाव येथील मूळ रहिवासी आहे.


संतोष रानमोडे याचे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे पवित्रा ट्रेडिंग कंपनी नावाचे धान्य खरेदी आडत दुकान होते.  संतोषने अशोक म्हस्के , निलेश सावळे यांच्या मदतीने चिखली परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना जादा दराने धान्य खरेदी करण्याचे अमिष देऊन शेतकऱ्याकडून, हरभरा, सोयाबीन, तूर, भुईमूग असा शेकडो क्विंटल शेतमाल खरेदी केला आणि बँक खात्यावर पैसे देतो असं सांगितलं.  मात्र शेतकऱ्यांना पैसे न देता घेतलेला माल विकून तिघे आरोपी फरार झाले होते. पैसे खात्यावर न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात येताच अनेक शेतकऱ्यांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती.


या प्रकरणी सुनिल मोडेकर  यांनी चिखली पोलिसात फिर्याद  दिल्याने मुख्य अरोपी संतोष रानमोडे, अशोक समाधान म्हस्के , निलेश सावळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपींविरुद्ध चिखली पोलिसात 161 शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. 


यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत 14 जुलै रोजी परंडा तालुक्यातील बावची येथून मुख्य आरोपी संतोष रानमोडे यास अटक केली. यावेळी रानमोडेची चौकशी केली. त्यानं उकिरड्यात पुरुन ठेवलेले 42 लाख 11 हजार 920 रुपयाची रोकड आणि कार पोलिसांनी जप्त केली आहे.