मुंबई : देशभरात गाजलेल्या नीट परीक्षा घोळाचं महाराष्ट्र कनेक्शन यापू्र्वीच उघड झालं असून थेट लातूरपर्यंत याचे धागेदोरे पोहोचले आहेत. विशेष म्हणजे याप्रकरणी लातूरमधून चार जणांना अटकही करण्यात आली आहे. सीबीआयकडून या घटनेचा तपास केला जात असून आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. आता, याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नीट पेपरफुटीप्रकरणातून एमबीए शिक्षित भामट्याला अटक केली आहे. नीट कौंसलिंग सेंटरच्या नावाखाली नीट परीक्षेत कमी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या उच्च शिक्षित भामट्याला बेळगावच्या मार्केट पोलिसांनी गजाआड केले. कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि मध्य प्रदेशात या भामट्याकडून अनेक विद्यार्थी व पालकांची फसवणूक करण्यात आली आहे.


नीट परीक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो म्हणून फसवणूक करणाऱ्या आरोपीला मार्केट पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडून रोख रक्कम,कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, क्रेडिट कार्ड, सिम कार्ड आदी जप्त केल्याची माहिती कायदा सुव्यवस्था विभागाचे पोलिस उपायुक्त रोहन जगदीश यांनी पत्रकार परिषदेत दिली.


पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव अरविंद उर्फ अरुणकुमार (43) असे असून तो मूळचा तेलंगणा राज्यातील आहे. पोलिसांनी मुंबईतून त्याला अटक केली. नीट परीक्षेत कमी गुण मिळालेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना एमबीबीएसला ॲडमिशन मिळवून देण्याचे आश्वासन अरविंद देत होता. यासाठी त्याने बेळगावात कौंसिलींग सेंटर या नावाने ऑफिसही थाटले होते. बेळगावात त्याने कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून एक कोटी तीस लाखाहून अधिक रक्कम उकळली होती. ऑफिसमध्ये त्याने अशा विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी बोलण्यासाठी टेली कॉलर देखील नेमले होते. फसवणूक झालेल्या एका पालकाने पोलिसात तक्रार दिल्यावर हे प्रकरण उघडकीस आले.


पोलिसांनी अरविंदचा शोध सुरू केला पण तो सतत सिम कार्ड बदलत असल्याने त्याला पकडण्यात अडचणी येत होत्या. अखेर त्याच्या कार चालकाच्या लोकेशनवरून मार्केट पोलिसांनी त्याला मुंबई येथे जाऊन अटक केली. अरविंद हा एमबीए असून विद्यार्थ्यांकडून पैसे गोळा केल्यावर तो ऑफिस बंद करून गाव सोडून पलायन करायचा. मुंबईत देखील त्याने नव्यानेच ऑफिस सुरू केले होते. पण बेळगाव पोलिसांनी त्याला अटक केल्यामुळे मुंबईत कोणाची फसवणूक झाली नाही. अरविंद याच्यावर तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश येथे देखील अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. त्याने विद्यार्थ्यांकडून उकळलेली रक्कम कोट्यवधींच्या घरात असून पोलीस तपासात सगळ्या बाबी उघड होणार आहेत.