NCRB Men Suicide Report : बंगळुरुमध्ये काम करत असलेला अभियंता अतुल सुभाष याने पत्नी आणि सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आणि सोशल मीडियावर पुरुषांवरील होणाऱ्या अन्यायावर चर्चा सुरू झाली. आत्महत्या करण्यापूर्वी अतुल सुभाषने सुमारे दीड तासाचा व्हिडीओ आणि 24 पानांची सुसाईड नोटही लिहिली आणि त्याला कशा पद्धतीने त्रास देण्यात आला याची माहिती दिली. त्यावरुन आता विवाहित पुरुषांच्या आत्महत्येसंबंधीही जोरदार चर्चा सुरू झाल्याचं दिसून येतंय.


गेल्या काही वर्षांमध्ये पुरुषांच्या आत्महत्या आणि बहुतांश विवाहित पुरुषांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होतंय. आत्महत्यांच्या घटनांमध्ये विवाहित महिलांची संख्या जास्त की विवाहित पुरुषांची संख्या जास्त याबाबत अनेकांनी इंटरनेटवर माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. 


विवाहित महिलांपेक्षा विवाहित पुरुषांची आत्महत्या अधिक


देशातील गुन्ह्यांशी संबंधित आकडेवारी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो म्हणजेच NCRB द्वारे जाहीर केली जाते. 2021 च्या NCRB अहवालात विवाहित महिलांच्या तुलनेत  विवाहित पुरुषांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त असल्याचं सांगितलं आहे. 


एनसीआरबीने 2021 मध्ये जारी केलेल्या अहवालानुसार, 81,063 विवाहित पुरुषांनी आत्महत्या केल्या आहेत. तर या काळात आत्महत्या केलेल्या विवाहित महिलांची संख्या 28,680 इतकी होती. या आकडेवारीनुसार, विवाहित स्त्रियांपेक्षा विवाहित पुरुषांनी आत्महत्या केल्याचं उघड आहे. या आत्महत्या प्रकरणांमध्ये कौटुंबिक वाद, आर्थिक संकट, सामाजिक दबाव ही प्रमुख कारणे होती. त्याचबरोबर कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि मानसिक दबावामुळे पुरुषांनीही आत्महत्येसारखे पाऊल उचलल्याचं यातून स्पष्ट होतंय.


गेल्या 5 वर्षांची आकडेवारी काय सांगते? 


एनसीआरबीने जाहीर केलेल्या गेल्या 5 वर्षांच्या आकडेवारीबद्दल बोलायचं झालं तर त्यातून आश्चर्यकारक माहिती समोर येते. एनसीआरबीची 2018 ते 2022 या दरम्यानच्या आकडेवारीचा विचार केला तर, 2018 मध्ये एकूण 1,34,516 आत्महत्येची प्रकरणे नोंदवली गेली. ज्यामध्ये महिलांची संख्या 42,391 होती. तर पुरुषांची संख्या 92,114 इतकी होती. 


सन 2019 बद्दल बोलायचे झाले तर एकूण 1,39,123 आत्महत्या झाल्या. त्यापैकी 41,493 महिला होत्या. तर ते 97,613 पुरुष होते. 


जर  2020 सालाबद्दल बोलायचे झाले तर तर आत्महत्येची एकूण प्रकरणे 1,53,052 होती. त्यापैकी 44,498 महिला होत्या. तर 1,08,532 पुरुष होते. 


सन 2021 मध्ये आत्महत्येची एकूण प्रकरणे 1,64,033 होती. ज्यामध्ये महिला 45,026 आणि पुरुष 1,18,979 होते. 


सन 2022 मध्ये आत्महत्येची एकूण प्रकरणे 1,70,924 होती. ज्यामध्ये महिला 48,172 आणि पुरुष 1,22,724 होते. 


म्हणजे या पाच वर्षांच्या काळात दर 1 महिलेच्या तुलनेत 2.44 पुरुषांनी आत्महत्या केल्याचं आकडेवारी सांगतेय.


ही बातमी वाचा: