लातूर : रेल्वेमध्ये प्रवास करत असताना एका विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी एनसीबीच्या एका बड्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आलीय. उदगीर-लातूर रोड दरम्यान एका विद्यार्थिनीची छेडछाड करण्यात आल्याचा प्रकार हैदराबाद-हडपसर या पँसेंजर रेल्वे गाडीमध्ये रात्री घडला असून याप्रकरणी विद्यार्थिनीने एका व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. छेडछाड करणारा व्यक्ती हा एनसीबीचा अधिकारी आहे. एनसीबीचा अधीक्षक असलेल्या दिनेश अंकुश चव्हाण या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
सध्या राज्यात एनसीबी विशेष सक्रिय आहे. मुंबईतील क्रूझवरील कथित ड्रग्ज पार्टीसंदर्भात दररोज वेगवेगळ्या बातम्यांनी एनसीबी सक्रिय आहे. सध्या चित्रपट अभिनेता शाहरुख खान आणि अन्य काही जणांना ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते एनसीबीविरुद्ध दररोज वेगवेगळे आरोप करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर एनसीबीच्या या अधिकाऱ्याला विद्यार्थीनीच्या छेडखानीप्रकरणी अटक झाली आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध परळी येथील जीआरपी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 354, 509 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची माहिती अशी की काल रात्री हैदराबाद-हडपसर या रेल्वेने एनसीबीचा एक अधिकारी आणि एक विद्यार्थिनी प्रवास करीत असताना त्या अधिकाऱ्याने विद्यार्थिनीची छेड काढली. त्यानुसार विद्यार्थिनीने रेल्वे पोलिसाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यावरून आरोपीस परळी रेल्वेच्या जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार लातूर रोड दरम्यान घडला आहे.
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे म्हणाले..
परळी-लातूर रोड दरम्यान हडपसर-हैदराबाद पॅसेंजर ट्र्नेमध्ये झालेल्या प्रकाराविषयी, एनसीबीचे मुंबईतील झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की दिनेश चव्हाण हे गेल्या अनेक दिवसांपासून रजेवर आहेत आणि ते एनसीबीचे अधिकारी असले तरी काही वैयक्तिक समस्यांमुळे एनसीबीच्या बाहेर आहेत. समीर वानखेडे यांनी असेही सांगितले की दिनेश चव्हाण त्यांच्या कोणत्याही ऑपरेशनमध्ये सहभागी नसतात. काही महिन्यांपूर्वी दिनेश चव्हाण यांचा अपघात झाला होता, त्यानंतर त्याला त्रास होत होता.
आरोपी दिनेश अंकुश चव्हाण (वय 35 वर्षे रा. ठी. सेक्टर 15, रुम नं.18, कोपरखैरणे, नवी मुंबई) हा नार्कोटिक्स डिपार्टमेंट, भारत सरकार यांचा अधीक्षक दर्जाचा अधिकारी आहे. त्यांच्याकडे ओळखपत्र असून एम.आर. पोलीस ठाणे, मुंबई शहर यांचे मार्फत याबाबत खात्री केली आहे.