कल्याण: काही महिन्यांपूर्वी कल्याणमध्ये अवघ्या 13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळी याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विशाल गवळी (Vishal Gawali Suicide) याला नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात (Taloja Jail) ठेवण्यात आले होते. त्याने रविवारी पहाटे चार ते पाचच्या दरम्यान तुरुंगातील शौचालयात जाऊन गळफास लावून घेतला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तळोजा कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. सध्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. तर विशाल गवळी याचा मृतदेह दक्षिण मुंबईतील जे .जे .रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

विशाल गवळीने आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर मृत मुलीच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. मुलीच्या वडिलांनी आपल्या लेकीच्या तसबि‍रीला हार घालत आणि त्याच्यासमोर दिवा लावून पूजन केले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आमच्या दीदीसोबत नराधमाने जे कृत्य केले, त्यासाठी आम्ही कोर्टात लढत होतो. विशाल गवळीने जे काही कृत्य केले होते, त्याची शिक्षा त्याला देवाने दिली. त्याच्यासोबत 'जशास तसा' न्याय झाला. यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. पोलिसांनीही आम्हाला खूप सहकार्य केले आणि पाठिंबा दिला. मी त्यांचाही आभारी आहे. प्रशासनाने चांगले काम केले आहे,  असे पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटले.

यावेळी त्यांनी विशाल गवळीचे कुटुंबीय अजूनही कल्याणमध्ये दहशत पसरवत असल्याचा आरोप केला. विशाल गवळी याचे दोघेही भाऊ तडीपार आहेत. ते या परिसरात दहशत निर्माण करायचा प्रयत्न करत असतात. त्यांच्याकडे हत्यारं आहेत. विशाल गवळी याचे वडीलही गुन्हेगारी वृत्तीचे आहेत. ते आमच्या कुटुंबावर हल्ला करु शकतात, अशी भीती मुलीच्या वडिलांनी बोलून दाखवली. 

विशाल गवळीने फास घेताच कल्याणमध्ये लागले बॅनर्स

विशाल गवळी याने तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर कल्याण पूर्वेला पीडित मुलगी राहत असलेल्या परिसरामध्ये अनेक बॅनर्स लावण्यात आले आहेत. मिस यू दीदी, नराधमाला फाशी झालीच पाहिजे, असा मजकूर या बॅनर्सवर लिहण्यात आला आहे. दरम्यान, विशाल गवळी याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे. त्यामुळे याप्रकरणात ट्विस्ट येऊ शकतो.

आणखी वाचा

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीची तळोजा कारागृहात आत्महत्या