Nashik Crime : नाशिक (Nashik) ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई सुरूच असून आता दिंडोरी तालुक्यातील (Dindori) जानोरी येथे छापा टाकला आहे. या छाप्यात जवळपास 20 लाख किमतीचा प्रतिबंधित पानमसाला साठा हस्तगत करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक शहाजी उमाप (Shahahi Umap) यांनी अवैध धंद्याविरोधात जोरदार कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या विविध भागात पथके कार्यान्वित करण्यात आली असून त्याच्या माध्यमातून दररोज जिल्ह्यात कारवाया करण्यात येत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी जानोरी औद्योगिक वसाहतीत जवळपास एक कोटी किमतीच्या अवैध डिझेल सदृश्य साठ्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने धडक कारवाई केली होती. त्यानंतर आज 20 लाख रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला साठा जप्त करण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी आदेशित केल्याप्रमाणे, जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी व्यापक स्वरूपावर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान जानोरीच्या ग्रामपंचायत सदस्यांनी दहावा मैल रोडलगत आशापुरा गोडाऊनमधील गाळा नं. 30 मध्ये तंबाखूजन्य अवैध साठा असल्याचे निदर्शनास आले. साठ्याबाबत विचारणा केली असता गाळ्यातील दोन कामगारांनी तेथून पळ काढला. यात काहीतरी चुकीचा प्रकार होत असल्याचे संशय आल्याने उपसरपंच हर्षल काठे यांनी दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पांडूरंग कावळे यांना दूरध्वनीद्वारे कळवले.
यावेळी संबंधित गाळा मालकाला बोलावून माणिकचंद मीनीचे 4600 पॅकेज, गोवा 1000 चे 455 पॅकेज, माणिकचंद पानमसाल्याचे 1000 पॅकेज, एमसी सुंगधी तंबाखू 1040 पॅकेज असे एकूण 19 लाख 46 हजार 400 रुपये किमतीच्या मानवी आरोग्यास घातक असलेल्या, त्याच्या विक्रीस अथवा साठा करण्यास प्रतिबंध असतानाही शासकीय आदेशाची अहवेलना करत प्रतिबंधित पानमसाला गाळ्यामध्ये विक्री करण्यासाठी साठा करताना मिळून आल्याने शनी हनुमान गुप्ता तसेच प्रदिप शर्मा, रा. मुंबई या आरोपींवर दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
त्याचबरोबर मागील काही दिवसांत जिल्ह्यातील अनेक भागात पथकांद्वारे कारवाई केली आहे. दारूबंदी, जुगार, गुटखा, अवैध शस्रे बाळगणारे, हॉटेल धाबे कारवाई, गांजा बाळगणे आदी कारवाया केल्या आहेत. या सर्व प्रकरणात 749 केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. तर 87 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.