Nashik News Updates : निवडणुकीत झालेला जय पराजय कधी जिव्हारी लागेल सांगता येत नाही. अन त्यातून कोण कुणाचा जीव घेईल अशी परिस्थिती निर्माण होते. अशीच एक घटना नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मध्ये घडली आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या सोसायटीच्या निवडणुकीनंतर झालेला वाद विकोपाला जाऊन विरोधी टोळक्याने जणांनी बाप लेकावर चाकू आणि लोखंडी गजाच्या साहाय्यानं प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात चाकूचा वार लागल्याने जखमी झालेल्या एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळवाडे येथे घडली. विशेष म्हणजे घटना घडत होती तेव्हा आमदार हिरामण खोसकर, संपत सकाळे हे उपस्थित होते, मात्र त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप जखमी अंकुश बोडके यांनी केला आहे.

 

दरम्यान काही दिवसांपूर्वीच येथील तळवाडे सोसायटीची विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. चेअरमन, व्हाईस चेअरमन ची देखील निवड बिनविरोध करण्यात आली. त्यावेळी ही संपूर्ण प्रक्रिया खेळीमेळीत पार पडल्यानंतर आता विरोधी गटाने विजयी गटाला बोलवून घेत बेदम चोप दिल्याचे समोर आले आहे. यात बाप लेक गंभीर जखमी झाले आहेत. सोसायटीचे चेअरमन पद न मिळाल्याने आमदारांसमोरच बाप लेकावर जीवघेणा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

तळवाडे येथील निवडणुकीनंतर चर्चा करण्यासाठी विरोधी गटाने त्यांना तळवाडे जवळील तुपादेवी फाटा येथे बोलवून घेतले. यावेळी अंकुश यांच्या बरोबर त्यांच्या वडिलांसह इतर सहकारी होते. अंकुश आणि सहकारी तुपादेवी फाट्यावर पोहचल्यानंतर विरोधी गटाने चर्चा न करता थेट त्यांच्यावर हल्ला चढविल्याचे अंकुश बोडके यांनी सांगितले. 40 ते 50 जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर लाठ्या-काठ्या सह धारदार चाकूसह लोखंडी गजाने वार करत तुटून पडले. 

 

विशेष म्हणजे हा सर्व गदारोळ सुरू असताना घटनास्थळी आमदार हिरामण खोसकर, संपतराव सकाळे आदी मंडळी उपस्थित होती. मात्र हे सर्व बघ्याची भूमिका घेऊन होते असा आरोप जखमी अंकुश बोडके यांनी केला आहे. दरम्यान जमावाने हल्ल्यात अंकुश बोडके आणि  पंढरीनाथ बोडके हे बापलेक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सुरवातिला त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

 

दरम्यान या प्रकरणी अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे का? कारवाई केली आहे? याबाबत अद्याप माहिती नाही. मात्र या घटनेवरून पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुन्हेगारी वाढत चालल्याचे चित्र दिसू लागले आहे.