Nashik Fire :  सिन्नर तालुक्यातील (Sinnar) मुसळगाव येथील आदिमा प्रायव्हेट लिमटेड या कारखान्यात आज (2 फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. कारखान्यात झालेल्या स्फोटांमुळे एमआयडीसी परिसर हादरला. आगीमुळे संपूर्ण एमआयडीसी परिसरात (MIDC) धुराचे लोळ पसरल्याचे चित्र होते. आगीमुळे कारखान्याचे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने कारखान्यातील 50 ते 60 कामगार सुखरूप असल्याची माहिती मिळाली असून जखमी अथवा जीवितहानीबाबत माहिती समोर आली नाही. 


दुपारच्या सुमारास कारखान्याला अचानक आग लागली. आकाशात सर्वत्र आगीचे लोळ सर्व दूरदूरपर्यंत दिसत असल्याने नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीची माहिती कळताच सिन्नर नगर परिषद आणि एमआयडीसीचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. आग लागलेल्या ठिकाणी अधून मधून स्फोटाचे आवाजही येत असल्याचे दिसत आहे. सिन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन नामकरण आवारे, व्यवस्थापक कमलाकर पोटे, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर हे घटनास्थळी तळ ठोकून आहे.  


अग्निशामक बंबाद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न अग्निशमन जवान करीत आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अजून स्पष्ट झाले नसून आगीवर लवकरात लवकर कसे नियंत्रण मिळवता येईल यासाठी सर्वजण प्रयत्न करीत आहे. आग अतिशय भीषण असल्याने आगीचे लोळ 10 ते 15 किलोमीटरवरून दिसत आहे. कारखान्यात 50 ते 60 कामगार काम करीत असून सर्व कामगारांना बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यामुळे कुठलीही जीवित हानी झाली नसल्याचे जमजत आहे.


घटनेच्या चौकशीचे निर्देश


मुसळगाव सिन्नर द्रुतगती मार्गावरील आदिमा ऑरगॅनिक केमिकल बनवणारी कंपनीला दुपारी 4 वाजता आग लागल्याचे समजताच संबंधित यंत्रणेशी संवाद साधून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केली आहे. प्राथमिक माहिती नुसार साधारण 20 ते 25 कर्मचाऱ्यांची कंपनी असून कामावर आज रोजी 10 ते 12 कर्मचारी हजर असल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशामक दलाच्या 5 गाड्या पोहचल्या असून आग आटोक्यात आणण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पोलीस, महसूल तसेच वैद्यकीय कर्मचारी घटनास्थळी उपस्थित आहेत. सर्वोतोपरी मदत याठिकाणी शासकीय पातळीवरून सुरू आहे. घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.