Nashik Crime News: नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांबरोबर सायबर क्राईमच्या (Nashik Cyber Crime News) घटना देखील समोर येत आहेत. यामध्ये सुशिक्षित नागरिक देखील फसत असल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरातील एका डॉक्टरांना सायबर क्राईमचा फटका बसला आहे.
नाशिकच्या शरणपूर रोड येथील एका वैद्यकीय व्यावसायिकाला सायबर भामट्याने दोन लाख 76 हजार 100 रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वैद्यकीय व्यवसायिक डॉ. सुदर्शन विजय पवार यांना एका सायबर भामट्याने बारा अंकी क्रमांकावरून फोन कॉल करून ब्लू डॉट कंपनीकडून बोलत असल्याचे सांगितले. यामध्ये प्रोसेस फीच्या नावाखाली फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. एक अनोळखी लिंक द्वारा ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर ऑनलाईन पेजवर यूपीआय पिन देण्यास भाग पाडून फोन पे खाते क्रमांक लिंक असणाऱ्या तीन खात्यातून यूपीआय द्वारे एकूण दोन लाख 76 हजार रुपये विविध खात्यांवर डेबिट करून डॉ. सुदर्शन पवार यांची आर्थिक फसवणूक केली. त्यामुळे डॉक्टर सुदर्शन पवार यांनी सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे.
एकीकडे सायबर क्राईमच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून मोबाईल हातातलं साधन झाल्याने अनेकजण याचा गैरवापर करताना आढळत आहेत. त्यामुळे अनेक क्लुप्त्या वापरून बँक खाते रिकामे होण्याची शक्यता असते. आता प्रत्येकजण अँड्रॉइड मोबाईल फोन वापरतो. त्यामुळे अनेकदा मोबाईलवर विविध नावाने असंख्य लिंक येतात. मात्र, कुठल्याही अनोळखी लिंक डाउनलोड किंवा ओपन केल्यास आपण पुन्हा नव्या लिंककडे जात असतो. यातून लुटारू टोळीकडे तुमच्या ऑनलाईन व्यवहाराची सर्व माहिती आणि इतर अपडेट पोहचते. मग टोळी त्वरित तुमच्या बँकेवर डल्ला मारून बँक खाते रिकामे होते.
व्हाट्सअॅपवरूनही फसवणूक....
सध्या व्हाट्सअॅप वापरणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अनेकदा लुटारू हे फसव्या लिंक पाठवून ग्राहकांना आकर्षित करत असतात. अनेकदा मोबाईल धारक सहजरित्या या लिंक ओपन करून पाहतात. अन आपसूक मोबाईल धारकाची बँक डिटेल्स चोरट्याकडे जाते. त्यामुळे बँक असो किंवा इतर कुठलेही शासकीय विभाग कधी लिंक पाठवत नाही. मोबाईलवर येणाऱ्या असंख्य लिंक या फसव्या असतात. याची दखल घेऊन कुठल्याही प्रकारे लिंक डाउनलोड किंवा लिंकद्वारे व्यवहार करू नका, अन्यथा ऑनलाईन भामटे हे तुमच्या व्यवहारावर लक्ष केंद्रित करीत आहेत. लिंक आली म्हणून घाबरून जाण्याचे कारण नाही. तेव्हा अशा बनावट लिंकला बळी पडू नका, सतर्क राहा, असे आवाहन करण्यात आले आहे.