Nashik Crime News नाशिक : गंगापूर रोड श्रमिकनगरमध्ये काही दिवसांपूर्वी वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आता जुन्या नाशकात (Old Nashik) अज्ञात समाजकंटाकांकडून सात वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. पाच दुचाकी, एक छोटा हत्ती आणि एक हातगाडी अशा सात गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान (Nashik Crime News) करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी (Nashik Police) अज्ञात समाजकंटकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. जुन्या नाशकातील कुंभारवाड्यात ही घटना घडली आहे. वाहनांना आग लागल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
आग विझविण्यासाठी घरातील पाण्याचा वापर
परिसरातील लोकांनी आग विझविण्यासाठी घरातील पाण्याचा वापर केला. घटनेचा पंचनामा केल्यानंतर सर्व नुकसानग्रस्त वाहने भद्रकाली पोलीस ठाण्याच्या आवारात आणण्यात आली. तसेच अज्ञात समाजकंटकांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.
समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी
या घटनेमुळे जुन्या नाशकातील नागरिकांमध्ये संताप करण्यात येत आहे. अशा समाजकंटकांविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी अनेक नागरिकांनी केली आहे. यापूर्वी देखील भद्रकाली हद्दीतील चौक मंडई परिसरातील बिरबल आखाडा भागात वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार घडला होता. तसेच शहरातील इतर भागांमध्ये वाहनांची जाळपोळ करण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
श्रमिकनगरला वाहनांच्या तोडफोडप्रकरणी पाच जण ताब्यात
सातपूरच्या श्रमिकनगर (Shramiknagar) परिसरात रविवारी मद्यपी टोळक्याने गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून अन्य संशयितांना शोध सुरु आहे. पाच जणांपैकी चार जण हे सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
गंगापूर रोडवर तोडफोड करणाऱ्यांची धिंड
गंगापूर जकात नाका (Gangapur Road) येथे रस्त्याने जाणाऱ्या गाड्या अडवून त्यांच्यावर दगडफेक करीत काचा फोडणाऱ्या पाच संशयितांना पोलिसांनी अटक करून त्यांची धिंड काढली. हे पाचही संशयित फरार झाले होते. मात्र, पोलिसांनी गुप्त खबऱ्यामार्फत शोध घेतला. अनिकेत उर्फ पप्पू शार्दल, प्रतीक जाधव, विजय कोटरे, चिंटू गागुंडे, रोहित वाडगे हे सर्व शिवाजीनगर, ध्रुवनगर भागात राहतात. त्यांना कोकणगाव (ता. दिंडोरी) येथून पथकाने ताब्यात घेतले. त्यांना अटक केल्यानंतर ज्या भागात काचा फोडल्या त्या भागातून त्यांची धिंड काढण्यात आली.
आणखी वाचा