Nashik Crime : नाशिकच्या श्रमिकनगर (Shramiknagar) परिसरातील कडेपठार येथे दोन जणांच्या वादात झालेल्या मारहाणीत रिक्षाचालक इसमाचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. प्रकाश मधुकर सूर्यवंशी (39) असे मृत झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही वर्षांपासून मृत प्रकाश सूर्यवंशी हे स्वामी नरेंद छाया हाइट्स कडेपठार सोसायटीत कुटुंबासोबत राहत होते. गुरुवारी रात्री त्याच सोसायटीत राहणारे गणेश पाटील हे रात्री बारा वाजता सोसायटीच्या पार्किंगमध्ये गप्पा मारत उभे होते. याच दरम्यान चार संशयित हे गणेश पाटील यांच्या आतेभाऊ असलेल्या किरण जमदाडे यांच्यासोबत झालेल्या जुन्या वादातून मारहाण करण्यास आले होते. 

भांडण सोडवणे पडले महागात

टोळक्याने त्यांचा भाऊ गणेश पाटील यांना किरण जमदाडेबाबत विचारपूस केली. किरण जमदाडे न भेटल्याने संशयित टोळक्याने पाटील यांच्यावर हल्ला केला. हा वाद सोडवण्याचा प्रकाश सूर्यवंशी प्रयत्न करीत असताना टोळक्याने कोयता व धारदार शस्त्राने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. जखमी झालेल्या सूर्यवंशी यांना रात्री नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हल्ल्यात सूर्यवंशी यांच्या किडनीजवळ आणि पाठीवर गंभीर घाव झाले होते.  उपचारादरम्यान शनिवारी प्रकाश सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. 

परप्रांतीयाकडून कात्रीने तिघांवर हल्ला 

दरम्यान, परप्रांतीय कपडे शिवणाऱ्या व्यापाऱ्यांनी पेठ तालुक्यातील तिघांवर कात्रीने हल्ला करून गंभीर जखमी केले. वणी येथील पटांगणालगत असलेल्या पत्र्याच्या टपऱ्यांमधील परप्रांतीय कपडे शिवणाऱ्या काही टेलरकडे कपडे खरेदीसाठी आले होते. आर्थिक व्यवहारातून वादावादी झाल्यामुळे हातातील कात्रीने पेठ तालुक्यातील तिघांबर हल्ला केला. यात हल्ल्यामध्ये प्रवीण काळू गुबांडे (25) गंभीर जखमी झाला तर हनुमंत गोविंदा राणाळे (50) व युबराज हनुमान राणाळे (सर्व रा. तोंडवळ, ता पेठ) हे किरकोळ जखमी आहे. जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केले. त्यातील एकाला उपचारासाठी नाशिक येथे रवाना केले आहे. परप्रांतीयांनी ग्राहकावर कात्रीने केलेल्या हल्ल्यामुळे परप्रांतीयांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nashik News : अंत्यविधीसाठी पाच हजार ठेवलेत, लॉकरमधील मंगळसूत्र अन् जोडवी लताला घाला; नाशिकच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकाच्या चिठ्ठीने मन सुन्न!

Cryptocurrency : क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करा, दरमहा पैसे अन् परदेशवारीची संधी; भामट्यांकडून तब्बल 38 जणांना लाखोंचा गंडा, आपबिती ऐकताच पोलीसही चक्रावले!