Nashik Crime News: एटीएम (ATM) कटरने फोडून रक्कम लुटण्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. मात्र नाशिकच्या (Nashik) सटाणा (Satana) येथे चोरट्यांनी एटीएम चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी थेट जीपला दोरखंड बांधून एटीएम उखडून काढले आणि ते जीपमध्ये टाकून अवघ्या 12 मिनिटांत घटनास्थळावरून पोबारा केला.

Continues below advertisement

ही घटना नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरातील ताहाराबाद रोडवरील यशवंत नगर परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली. अत्यंत नियोजनबद्ध आणि धाडसी पद्धतीने चोरट्यांनी एटीएम मशीनच उचलून नेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून बँकांच्या एटीएम सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Nashik Crime News: चोरट्यांनी एटीएम उखडून काढले

या चोरीत तीन अज्ञात चोरट्यांचा सहभाग आहे. शनिवारी रात्री 2 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास चोरटे जीपमधून एटीएम केंद्रावर पोहोचले. सुरुवातीला त्यांनी कटरच्या साहाय्याने एटीएमचे शटर तोडले. त्यानंतर एटीएम मशीनला दोरखंड बांधून जीप पुढे नेली. ओढताना दोन वेळा दोर तुटला, मात्र तिसऱ्या प्रयत्नात चोरट्यांनी संपूर्ण एटीएम उखडून बाहेर काढले. पहाटे 3 वाजून 2 मिनिटांनी एटीएम जीपमध्ये टाकून ते साक्रीच्या दिशेने फरार झाले.

Continues below advertisement

Nashik Crime News: दिल्लीतील मुख्यालयात अलार्म वाजला, पण...

एटीएममध्ये छेडछाड होताच दिल्लीतील मुख्यालयात अलार्म वाजला. तेथून नाशिक नियंत्रण कक्ष आणि त्यानंतर सटाणा पोलिसांना माहिती देण्यात आली. सूचना मिळताच सटाणा पोलीस अवघ्या 14 मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. बँक अधिकाऱ्यांना बोलावून सीसीटीव्ही तपासण्यात आले आणि चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला. या एटीएममध्ये एकूण 40 लाख रुपये ठेवण्यात आले होते. त्यापैकी सुमारे 14 लाख रुपये ग्राहकांनी काढल्यामुळे 25 लाख 99 हजार 400 रुपये शिल्लक होते. सीसीटीव्हीत दिसणारे चोरटे अंदाजे 30 वर्षांच्या आसपासचे असून त्यांनी आपले चेहरे कापडाने झाकले होते.

Nashik Crime News: धुळे जिल्ह्यात सापडले चोरीला गेलेले ATM

सटाण्यातून चोरी केलेले एटीएम घेऊन चोरटे धुळे जिल्ह्यातील साक्री शहराजवळ पोहोचले. एका शेतात पहाटेच्या अंधारात त्यांनी मशीन फोडून पैसे काढण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र काही अंतरावर असलेल्या स्थानिक नागरिकांना संशय आल्याने त्यांनी बॅटरीच्या प्रकाशात पाहणी केली. अचानक प्रकाशझोत पडताच चोरटे घाबरले आणि एटीएम मशीन तिथेच टाकून पळून गेले. याची माहिती साक्री पोलिसांना देण्यात आल्यानंतर हेच मशीन सटाण्यातून चोरीला गेलेले असल्याचे स्पष्ट झाले. सटाणा पोलीसही तत्काळ साक्रीत दाखल झाले. तपासात असे आढळून आले की, एटीएममधील पाचपैकी दोन ट्रे स्थानिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांना उघडता आले नाहीत. त्यामुळे 9 लाख 55 हजार 900 रुपये मशीनमध्येच सुरक्षित राहिले. मात्र उर्वरित 16 लाख 43 हजार 500 रुपयांची रोकड चोरटे घेऊन पसार झाले. दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून चोरट्यांचा कसून शोध सुरू आहे. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Solapur Crime News: वैयक्तिक रागातून बापाने पोटच्या जुळ्या मुलांना विहिरीत ढकललं, नंतर स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न; सोलापुरातील घटनेने खळबळ