Nashik Crime News: हॉटेल व्यवसायातून हमखास आणि भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणासह त्याच्या कुटुंबीयांकडून तब्बल 50 लाख रुपये उकळल्याचा गंभीर प्रकार नाशिकरोड (Nashik Road) परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) एका इसमासह त्याची पत्नी आणि आई यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik Crime News: हॉटेल व्यवसायातील अनुभवाचा बनाव
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखिल कैलास गुजराथी (रा. शिखरेवाडी, नाशिकरोड) यांची एप्रिल 2021 मध्ये संशयित आरोपी वेदांशू रवींद्र पाटील याच्याशी ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने स्वतःला हॉटेल व्यवसायातील अनुभवी आणि यशस्वी उद्योजक असल्याचे भासवले. आरोपीने फिर्यादीला महिरावणी परिसरात हॉटेल सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आणि संपूर्ण प्रोजेक्ट स्वतः हाताळून मोठा नफा मिळवून देण्याची हमी दिली. आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांनी कन्सल्टन्सी, बांधकाम, इंटिरियर तसेच इतर खर्चासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक केली.
Nashik Crime News: ‘अर्बन एअर फूड कोर्ट’ तोट्यात
आरोपीच्या मार्गदर्शनाखाली ‘अर्बन एअर फूड कोर्ट’ या नावाने हॉटेल सुरू करण्यात आले. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच हा व्यवसाय तोट्यात गेल्याने अखेर बंद पडला. यामुळे फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आर्थिक फटका बसला.
Nashik Crime News: नवीन प्रोजेक्टचे आमिष; पुन्हा आर्थिक मागणी
हॉटेल बंद पडल्यानंतरही आरोपीने नुकसान भरून काढून देण्याचे आमिष दाखवत नवीन प्रोजेक्टचा प्रस्ताव दिला. बंद पडलेल्या हॉटेलच्या जागेवर ओपन ड्राईव्ह-इन थिएटर सुरू करून भरघोस नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत आरोपीने पुन्हा मोठ्या रकमेची मागणी केली. या आमिषाला बळी पडून फिर्यादीकडून वेगवेगळ्या तारखांना धनादेशाद्वारे एकूण 50 लाख रुपये आरोपी वेदांशू पाटील, त्याची पत्नी तिलोत्तमा पाटील आणि आई करिश्मा पाटील यांच्या खात्यावर वटवून घेण्यात आले.
Nashik Crime News: आरोपीकडून केवळ टाळाटाळ
मात्र, प्रस्तावित ड्राईव्ह-इन थिएटर प्रोजेक्टबाबत कोणतीही ठोस कागदपत्रे देण्यात आली नाहीत, तसेच प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू झाले नाही. वारंवार विचारणा करूनही आरोपीकडून केवळ टाळाटाळ केली जात असल्याचे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.
Nashik Crime News: उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अखेर फिर्यादी निखिल गुजराथी यांनी उपनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून वेदांशू रवींद्र पाटील, तिलोत्तमा पाटील आणि करिश्मा पाटील यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा