Nashik Crime News: गेल्या पंधरा वर्षांपासून निराधार जीवन जगणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. सूरत येथे ओळख झालेल्या तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये (Live-in relationship) राहत असताना या अल्पवयीन मुलीने गोंडस बाळाला जन्म दिला. प्रसव वेदना सुरू झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यावर वैद्यकीय कायदेशीर नोंद (एमएलसी) करताना हा प्रकार समोर आला. त्यानंतर भद्रकाली पोलिसांनी संशयित तरुणाविरोधात पोक्सो (POCSO) कायद्यासह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पीडिता ही सध्या 17 वर्षे 10 महिने वयोगटातील असून ती अनेक वर्षांपासून निराधार अवस्थेत राहत आहे. काही वर्षांपूर्वी सूरत येथे उदरनिर्वाह करत असताना तिची ओळख नरेश शालिकराम राक्षे (रा. गणेशबाबानगर, पुणे रोड, नाशिक) या तरुणाशी झाली. ओळखीचे रूपांतर पुढे संबंधात झाले आणि नंतर संशयिताने तिला नाशिकमध्ये आणले.
Nashik Crime News: नाशिकमध्ये ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये वास्तव्य
नाशिकरोड, सिन्नर तसेच गणेशबाबानगर परिसरातील एका निर्माणाधीन सोसायटीत दोघेही वॉचमन व मोलमजुरीचे काम करत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहत होते. या काळात पीडिता गरोदर राहिली. ही बाब समोर आल्यानंतर काही दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी तिला नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील सिव्हिल पोलीस चौकीत एमएलसी नोंदविण्यात आली असता पीडिता अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी तिचे कोणतेही नातेवाईक किंवा पालक समोर आले नाहीत. पीडितेने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार प्रकरणाची नोंद करण्यात आली आणि ती माहिती पुढील कारवाईसाठी भद्रकाली पोलिसांकडे वर्ग करण्यात आली.
Nashik Crime News: 'पोक्सो'अंतर्गत गुन्हा दाखल
भद्रकाली पोलिसांनी पीडितेचा सविस्तर जबाब नोंदवून तपास केला असता, संशयित नरेश राक्षे याला पीडिता अल्पवयीन असल्याची माहिती असूनही त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोक्सो अधिनियम 2012 अंतर्गत तसेच बलात्काराच्या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, नवव्या महिन्याच्या सुरुवातीलाच पीडितेला प्रसवकळा सुरू झाल्याने तिने अकाली बाळाला जन्म दिला. अकाली जन्म झाल्यामुळे बाळावर सध्या आरटीओजवळील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पीडिता सध्या सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा