Maharashtra Nashik Crime News : दुपारी दीड वाजेची घटना... वर्दळीचा रस्ता... रस्त्याने जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाला दुसऱ्या वाहनाने धडक दिली. संशयित वाहनातून उतरले आणि थेट गोळीबार (Gun Fire) करण्यास सुरुवात केली. तर काही संशयित कोयता घेऊन तरुणाच्या मागे पळाले. हा सगळा थरार एखाद्या चित्रपटाप्रमाणे नाशिक शहरात घडला. ही सर्व घटना देखील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 


नाशिक (Nashik) शहरातील क्राईम रेट इतका वाढला असून कुणालाच पोलिसांचा (Nashik Police) धाक राहिला नसल्याचे चित्र आहे. वारंवार खुनाच्या घटना घडत आहेत. या याआधी प्राणघातक हल्ला, मारहाण अशा घटना होत होत्या. मात्र आता थेट बंदुकीतून गोळ्या झाडत गँगवॉर घडत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे सामान्य जनता मात्र दहशतीखाली आहे. काही दिवसांपूर्वी फुलेनगर (Fulenagar) परिसरात घरात घुसून गोळीबाराची घटना घडली होती. मात्र आज थेट गाडीला ठोकर मारून संशयितांना गोळीबार केला आहे. या घटनेत एका तरुणाला गोळी लागल्याचे समजते आहे. या प्रकरणी सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


नाशिक शहरातील सातपूर पोलीस ठाण्याच्या (Satpur Police) हद्दीत असलेल्या कार्बन नाका परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली. दुपारी दीड वाजेच्या सुमारास फिर्यादी व त्यांचा मित्र तपन जाधव हे दोघे चार चाकी वाहनाने गंगापूर येथून सिडको येथे मित्र किरण साळुंखे यांच्या घरी जात होते. कार्बन नाका परिसरातील महिंद्रा सोना कंपनीजवळ आले असताना मागून येणाऱ्या दुसऱ्या वाहनाने गाडीला जोरात धडक दिली. त्या गाडीमध्ये असलेल्या संशयित आशिष राजेंद्र जाधव यांने बंदुकीतून गोळी झाडली. तसेच चेतन अशोक इंगळे, अक्षय उत्तम भारती, गणेश राजेंद्र जाधव, किरण चव्हाण यांनी कोयता घेऊन फिर्यादीवर चालून जात  फिर्यादीवर वार केले. फिर्यादी पळून जात असताना संशयितांना रस्त्यात दुसऱ्या एका शार्दुल नावाचं दुचाकीचालकास अडवले. त्याला बंदुकाचा धाक दाखवून त्याच्याजवळ असलेली मोटरसायकल घेऊन पळ काढला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 


जुन्या वादातून गोळीबारासह हल्ला 


सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कार्बन नाका परिसरात महिंद्रा सोना कंपनी समोर दोन कार एकमेकांसमोर आल्यानंतर एकाने गोळी झाडली आहे. पूर्ववैमण्यशतून हा गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे. भर दिवसा तरुणावर जीवघेणा हल्ला झाला आहे. हप्ता देत नाही तसेच जुन्या वादातून तिघांनी तरुणावर गोळीबार तसेच कोयत्याने वार केले. यानंतर मारेकऱ्यांनी आपले वाहन घटनास्थळी सोडून कामगाराला धाक दाखवत त्याच्या दुचाकीने पळ काढला. या हल्ल्यात तपन जाधव गंभीररित्या जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही सिनेस्टाईल घटना रविवारी दुपारी घडली.