Nanded News : शिक्षकाने (Teacher) शाळेत मुलाला मारहाण का केली, याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पालकाने (Guardian) चक्क शिक्षकाला बेदम मारहाण केली. ही घटना नांदेड (Nanded) जिल्ह्यातील माळाकोळी येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये 24 नोव्हेंबर रोजी घडली. संबंधित पालकाने वर्गातील विद्यार्थ्यांसमोरच शिक्षकाला मारहाण केली. या मारहाणी प्रकरणी पालकाविरोधात पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


किशोर शंकरराव विधाते असे शिक्षकाचे नाव असून माळाकोळी येथील जिल्हा परिषद हायस्कूलवर ते शिक्षक आहेत. 24 नोव्हेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास ते नववीच्या वर्गात विद्यार्थ्यांना शिकवत होते. त्याचवेळी मधुकर सीताराम राठोड हे पालक वर्गात धडकले. माझ्या मुलाला मारहाण का केली, म्हणून जाब विचारत त्यांनी शिक्षक किशोर विधाते यांना बेदम मारहाण केली.


दरम्यान, मधुकर राठोड यांच्या मुलाने खोडी केल्यामुळे शिक्षक किशोर विधाते यांनी शिक्षा म्हणून फटके दिले होते. विद्यार्थ्याने ही बाब घरी जाऊन वडिलांना सांगितली. यामुळे त्याच्या पालकांचा पारा चढला होता आणि त्यांनी रागाच्या भरात येऊन शिक्षकांना मारहाण केली.


या मारहाणीनंतर शिक्षक किशोर विधाते यांनी संबंधित पालकाविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीवर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.


जिल्हा परिषदेच्या मद्यपी शिक्षकाची सरपंचाला मारहाण
काही दिवसांपूर्वी पालघरमध्ये जिल्हा परिषदेच्या मद्यपी शिक्षकाने सरपंचाला मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ एबीपी माझाने समोर आणला होता. अखेर या बातमीची दखल घेत मद्यपी जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचं निलंबन करण्यात आलं. जिल्हा परिषद शाळेच्या काही समस्या आहेत का हे विचारायला शाळेत गेलेल्या सरपंचाला शिक्षकाकडून मारहाण करण्यात आली होती.  


शिक्षकाची विद्यार्थ्याला अमानुष मारहाण, मणक्याला दुखापत
तर दुसरीकडे सरकारी शाळेतील शिक्षकाने केलेल्या अमानुष मारहाणीत एका विद्यार्थ्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना राजस्थानमधील टोंकमधल्या राजकीय उच्च माध्यमिक विद्यालयात घडली. मनिष बनेठा (वय 15 वर्षे) असं मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. मनिष शाळेत असताना जेवणाच्या सुट्टीत मित्रांसोबत जेवताना गप्पा मारत होता. मात्र, त्याच वेळी तिथून जाणाऱ्या नरेंद्र जैन नावाच्या शिक्षकाने त्याला गप्पा मारताना पाहिलं. ही बाब त्यांना एवढी खटकली की त्याने  मनिषला जमिनीवर लोळवत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याच मारहाणीत मनिषच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली.