नांदेड : आठ दिवसांपूर्वी नांदेड येथे खलिस्तानवादी दहशतवादी म्हणून पकडण्यात आलेला पंजाबी युवक निर्दोष आहे. पंजाब पोलिसांनी कोर्टात रिपोर्ट दाखल करून त्याला सोडून दिले आहे. गुरपिंदरसिंग संतासिंग उर्फ ग्यानी असे या युवकाचे नाव असून पंजाब राज्यातील ता. गुरुसर जिल्हा मुक्तसर येथील तो रहिवाशी आहे. अटकेनंतर न्यायालयात हजर करून प्रवासी रिमांडवर त्याला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.
7 फेब्रुवारी रोजी नांदेड येथील शिकारघाट परिसरात पंजाब पोलीस व नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कार्यवाही करत गुरपिंदरसिंग संतासिंग नावाच्या 33 वर्षीय पंजाबी युवकास खलिस्तानी दहशतवादी असल्याच्या संशयातून अटक केली होती. गुरपिंदर सिंग हा पंजाब राज्यातील ता. गुरुसर जिल्हा. मुक्तसर येथील राहिवाशी आहे. खलिस्तान जिंदाबाद संघटनेच्या चार दाहशतवाद्या विरोधात पंजाब येथे बंदी आदेश घालण्यात आलीय. त्यातील एक आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात आहे, त्याने पंजाब पोलिसांना गुरपिंदरसिंग संतासिंग हा आमचा साथीदार असल्याची माहिती दिली. त्यानुसार पंजाब पोलीस व स्थनिक गुन्हे शाखा नांदेड यांनी संयुक्त कार्यवाही करत गुरपिंदर सिंग याला नांदेड येथे अटक करून प्रवासी रिमांडवर घेऊन पंजाबला रवाना करण्यात आले. परंतु, पंजाब पोलिसांच्या पुढील तपासात गुरपिंदर सिंग हा युवक दोषी न आढळल्यामुळे पंजाब पोलिसांनी स्वतः कोर्टात रिपोर्ट दाखल करून तो निर्दोश असल्याचे सांगितले व त्याला सोडून देण्यात आले. या सर्व घटनेची माहिती एबीपी माझाला नांदेड गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर व पंजाब येथील आयओ जसविंदर सिंग यांनी दिली.
पंजाबात गुन्हे अन् नांदेडमध्ये आश्रय
गेल्या दोन वर्षापासून नांदेड शहरात गोळीबार, खून, खंडणी, गँगवार सारख्या घटनांमुळे सर्वसामान्य नांदेडकरांची घाबरगुंडी उडाली आहे. 1988, 1990 च्या काळात पंजाबमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांनी धुडगूस घातला होता. त्यावेळी सरकारने कारवाई करत अनेकांना बेड्या घातल्या होत्या, तर अनेकांचा खात्मा केला होता. याच काळात शहरातील वाजीराबाद पोलीस ठाण्यात बॉम्बस्फोट करण्यात आला होता. त्यावेळी मोंढा भागातील हॉटेलमध्ये खलिस्तानवादी अतिरेक्याला पकडण्यात आले होते. त्यानंतर पंजाब पोलिसांना वॉन्टेड असणारे गुन्हेगार नांदेडमध्ये आश्रयास येणे सुरूच आहे.