Nanded Latest Crime News Update : जुन्या प्रेम प्रकरणाच्या वादातून नांदेडमध्ये एका तरूणाचा खून करण्यात आला. ही घटना नांदेड येथे 17 जुलै रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली आहे. किरण भास्करराव माने (28) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेतील चौघांना पोलीसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरु केला आहे.
 
किरण भास्करराव माने यांच्या खून प्रकरणी प्रतिभा किरण माने यांनी पोलीसात तक्रार दिली. किरण माने हे मजुरी करून कुटुंबाची उपजिविका भागवत होते. 17 जुलै 2023 रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास किरण हे नेहमी प्रमाणे कामाला गेले होते. दरम्यान, श्वान आजारी असल्याने दवाखान्यात दाखविण्यासाठी अविनाश नदाने यांच्यासोबत जिमी ( श्वान) ला पाठवून दे', असे किरणने घरी पत्नीला फोन करून सांगितले होते. त्यानुसार अविनाशने श्वानला घेवून गेला. रात्रीचे नऊ वाजले तरी किरण घरी आला नाही. तत्पूर्वी साडेआठ वाजताच्या सुमारास किरणने अविनाशसोबत आपण पाण्याच्या टाकीजवळ असल्याचे सांगितले होते. थोड्या वेळाने रात्री नऊ वाजताच्या सुमारास प्रतिभा या आपल्या लहान भावाला सोबत घेऊन चौफाळा येथील पाण्याच्या टाकीच्या गेट मधील पत्र्याच्या खोलीत डोकावून पाहिले असता शिवा माने व अविनाश नंदाने हे दोघे त्यांच्या हातात खंजर घेवून पळताना दिसले. तर, पत्र्याच्या खोलीमध्ये किरण माने हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांच्या छातीवर, पोटावर, मानेजवळ खंजीरने अनेक वार केलेले होते.  प्रतिभा या बाहेर येवून जोरात ओरडल्याने गल्लीतील नागरिक, नातेवाईक आले. पोलीसांनी किरण माने यांना सरकारी दवाखाना विष्णुपुरी नांदेड येथे घेवून गेले असता तेथील डॉक्टरानी त्यांना तपासून मृत झाल्याचे सांगितले. प्रतिभा यांनी पोलिसांमध्ये नोंदवलेल्या तक्रारीत असे म्हटलेय. 
 
दोन वर्षापूर्वी होते प्रेमसंबंध


किरण माने यांचे रंजनाबाई एडके यांच्या मुलीसोबत दोन वर्षापूर्वी प्रेमसंबंध होते. त्यावरून रंजना बाई, शिवा माने यांचे किरण माने यांच्यासोबत वाद झाले. या वादातून  दुष्मनी निर्माण झाली होती. या कारणावरून किरण भास्कर माने  यांना शिवा माने व अविनाश भाऊ नंदाने यांनी बोलावून घेवून खंजीरने छातीवर, पोटावर, मानेवर अनेक वार करून खून केला आहे, असे किरण माने यांची पत्नी प्रतिभा माने यांनी तक्ररीत म्हटले आहे. याप्रकरणी प्रतिभा माने यांच्या फिर्यादीवरून, इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरु केली आहे.