Nanded News : नांदेड जिल्ह्यातील बारड इथे आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे, ज्यात सख्ख्या आईनेच पोटच्या मुलाचा काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 14 ऑगस्ट रोजी बारड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुशील नामक युवकाचा खून झाला होता. या प्रकरणी बारड पोलिसांनी छडा लावत या खूनामागे मयताची आईच असल्याचे समोर आलं आहे.


दरम्यान मुलगा दारु पिऊन नेहमीच घरी आई-वडिलांना मारहाण करत त्रास देत असल्याने आईने हे टोकाचे पाऊल उचललं. या घटनेत आईने आपल्याकडे असलेल्या भाडेकरु राजेश गौतम पाटील आणि त्याचा मित्र विशाल देवराव भगत यांना 50 हजार रुपयांची सुपारी देऊन सुशीलचा खून करण्यास सांगितलं होतं. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले असून त्यांनी खूनाची कबुली दिली. या हत्या प्रकरणात मयत सुशीलच्या आईनेच हा खून घडवला असल्याचं समोर आलं आहे.


दारुच्या व्यसनासाठी पैशांची मागणी करत आई वडिलांना मारहाण
दारुच्या व्यसनापायी पैशांची मागणी करत मुलगा सुशील कायमच आई-वडिलांना मारहाण करत होता. त्यामुळे कंटाळलेल्या आईने दोघांना सुपारी देऊन आपल्या पोटच्या मुलाचाच काटा काढला. ही घटना बारड शिवारात घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा उलगडा केला असून आईसह सुपारी घेणाऱ्या दोघांना अटक केली आहे.


आईनेच सुशीलचा काटा काढण्याचा निर्णय घेतला 
15 ऑगस्ट रोजी बारड शिवारात कॅनॉलच्या शेजारी सुशील त्र्यंबकराव श्रीमंगले याचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात पंचनामा केल्यानंतर मयत सुशील याच्या गळ्यावर व्रण आढळून आले. तसंच डोक्यावर मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणात बारड पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. मयत सुशील श्रीमंगले हा मजूर असून तो नांदेडच्या गीतानगर येथील रहिवासी होता. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने आपल्याकडे घेतला. पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमंगले याचे घर गाठून चौकशीला सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही भाडेकरुंची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला. मयत सुशील श्रीमंगले याला दारुचे व्यसन होते. त्यातून तो आई शोभा श्रीमंगले आणि वडिलांना नेहमी मारहाण करत होता. अनेक वेळा समजूत घातल्यानंतरही तो दारुच्या पैशांसाठी त्रास देत होता. तसंच घर विकून पैशांची मागणी करत होता. नेहमी होत असलेल्या या त्रासाला कंटाळून शोभाबाई यांनी मुलगा सुशीलचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.


गळा आवळून सुशील श्रीमंगले याचा खून
शोभाबाई यांच्या घरी भाड्याने राहत असलेल्या राजेश गौतम पाटील आणि विशाल देवराव भगत या दोघांना त्यासाठी शोभाबाई यांनी सुपारी दिली. त्यानंतर या दोघांनीही सुशीलला बारड परिसरात नेले. या ठिकाणी गळा आवळून त्याचा खून करण्यात आला. पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून बारड पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. बारड पोलीस अधिक तपास करत आहे.