Nanded Crime : लग्नासाठी मुलगी देण्यास नकार दिल्याने भाच्याने मामाची निर्दयीपणे हत्या केली. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात चाभरा गावात ही वेदनादायक घटना घडली. पोलिसांनी मारेकरी भाच्याला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चाभरा गावात 10 सप्टेंबर रोजी खुनाची घटना घडली होती. ज्यात घराबाहेर ओसरीत गाढ झोपेत असलेल्या बालाजी दिगंबर काकडे या इसमाचा अज्ञात व्यक्तीने झोपेत डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृण खून केला होता. दरम्यान ही घटना चोरांनी केली की कुणी घातपात केला, याचा उलगडा करण्याचा मोठा यक्षप्रश्न पोलिसांपुढे होता. दरम्यान पाच दिवसाच्या तपासाअंती, बालाजी काकडे यांचा खून हा त्यांचा भाचा बंडू याने डोक्यावर कुऱ्हाडीने वार करुन केल्याचे निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मामा काकडे यांनी मुलगी देण्यास नकार दिल्याने आरोपीने मामाची हत्या केली. 


बालाजी घराबाहेर गाढ झोपेत असताना रात्री उशिरा एका अज्ञाताने बालाजीवर कुऱ्हाडीने वार करुन सतत तीन ते चार वार करुन जखमी केले. बालाजीच्या कुटुंबाला आवाज येताच गंभीर जखमी झालेला बालाजी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, जखमी बालाजीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मयताची पत्नी कल्पना काकडे हिच्या सांगण्यावरुन मनाठा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


ही घटना घडवून आणणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथक तयार करुन त्याचा शोध घेत होते. खून कोणी केला याचा गुप्त माहितीच्या आधारे पोलीस शोध घेत होते. बालाजी काकडे याचा खून करणारा अन्य कोणी नाही तर त्याचा मेहुणा बंडू जाधव असल्याचे तपासात समोर आले. आरोपी बंडू चाभरा गावात येताच पोलिसांनी चतुराईने त्याला अटक केली. पोलिसांना आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. 


पोलिसांनी आरोपी बंडू जाधवची कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की, "मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे, असे मी अनेक वेळा माझ्या मामाला सांगायचो पण मामा नकार द्यायचा." मराठी गाण "हुंडा नको, मामा फक्त मुलगी द्या, पण. ही गोष्ट मामाला मान्य नव्हती, अशी माहिती मामाची निर्दयीपणे हत्या करणाऱ्या भाच्याने पोलिसांनी दिली. मृत बालाजीच्या पत्नीने सांगितले की, आरोपी भाच्याला  घर बांधण्यासाठी पैसे देऊन सर्वतोपरी मदत करत होते, मात्र माझ्या नवऱ्याची हत्या केली. त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही मृत बालाजीची पत्नी कल्पना सांगितले आहे.