नागपूरः नागपुरातून (Nagpur) बेपत्ता असलेल्या प्रदीप मोतीरामानी यांचे अपहरण त्यांच्याच एका मैत्रिणीने खंडणीसाठी केल्याचे समोर आले आहे. आपल्या घटस्फोटीत पती आणि त्याच्या मित्रांच्या मदतीने 30 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची माहिती आहे. जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत ही घटना घडली होती. पैसे न दिल्यास मृतदेहच पाठविण्याची धमकी आरोपींनी दिल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणी काही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
सुटकेसाठी 30 लाखांची मागणी
प्रदीप मोतीरामानी (वय 46, रा. क्रिष्णाती चौक, जरीपटका) हे नागपूरातील महात्मा गांधी शाळेचे (Mahatma Gandhi Primary School) मुख्याध्यापक असून शुक्रवार संध्याकाळी ते काही कामानिमित्ताने घराबाहेर पडले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाही. शुक्रवारी रात्री जेव्हा त्यांच्या मुलीने वडिलांच्या फोनवर संपर्क साधले. तेव्हा अपहरणकर्त्यानी प्रदीप यांच्या सुटकेसाठी 30 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर मोतीरामानी कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती. शुक्रवार रात्रीपासून पोलीस पथक प्रदीप यांचे शोध घेत असताना काल संध्याकाळी ते सुखरूप परतले.
खास मैत्री अन् सोडली नोकरी
या प्रकरणी पोलिसांनी रीना फ्रान्सिस (वय 44, रा. महाराणा अपार्टमेंट, मानकापूर, सूरज फलके (वय 20) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील विक्की जैस हा आरोपी अद्यापही फरार आहे. याच शाळेत रीना फ्रान्सिस ही शिक्षिका म्हणून कार्यरत होती. दरम्यान, रीना आणि प्रदीप यांच्यात 'खास' मैत्री झाली होती. त्यानंतर रीनाने तेथून नोकरी सोडून हिंगण्याच्या एका शाळेत नोकरी सुरु केली.
आर्थिक तंगीतून उचलले पाऊल
रीना आणि तिचा पती नोएल यांना एक मुलगी आहे. परंतु आपसात पटत नसल्याने त्यांनी 2009 मध्ये घटस्फोट घेतला. दुसऱ्या शाळेत शिकविणे सुरु केले तरीही रीना आणि प्रदीपचे प्रेमसंबंध कायम होते. अशातच आर्थिक तंगीतून रीना आणि तिच्या घटस्फोट झालेल्या पतीने प्रदीपच्या अपहरणाचा बेत आखून शुक्रवारी रात्री 10.30 वाजता त्याचे अपहरण केले. परंतु पोलिसांनी माहिती मिळाल्याचे पाहून आरोपींनी शनिवारी दुपारी 3वाजता प्रदीपला सोडून दिले. प्रदीपचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांची पत्नी ज्योती प्रदीप मोतीरामानी (वय 46) यांनी जरीपटका ठाण्यात दिली. तसेच 30 लाखांची मागणी आरोपींनी केल्याचे पोलिसांना सांगितल्याने पोलिसात खळबळ उडाली. पोलिसांनी तपासचक्र फिरवून काही तासांतच आरोपींना ताब्यात घेतले.
मौदा येथे जाऊन मागितली खंडणी
प्रदीपचे अपहरण करुन विक्की जैस याच्या व्हर्ना कारमध्ये बसवून मानकापूरच्या महाराणा 1 अपार्टमेंटमध्ये पहिल्या माळ्यावर राहत असलेल्या नोएल फ्रांसिसच्या फ्लॅटवर नेले. रात्रभर प्रदीपला आरोपींनी तेथेच ठेवले. तसेच मौदा येथे जाऊन प्रदीपच्या मोबाईलवरुन 30 लाख रुपयांची खंडणी मागितली. मात्र हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्याने घाबरुन आरोपींनी मुख्याध्यापकाला सोडून दिले. प्रदीपच्या कुटुंबियांकडून 15 लाख रुपये मिळतील अशी आरोपींना अपेक्षा होती. दरम्यान, आरोपी नोएल फ्रांसिसकडे बंदूक आणि चार राउंड सापडल्याची माहिती पोलीसांकडून देण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या