नागपूर : गुन्हेगार कितीही सराईत असले तरी ते एक तरी चूक करतातच. आणि तीच चूक त्यांना गजाआड करण्यासाठी पुरेशी ठरते. नागपुरात लाखोंचा यशस्वी दरोडा घालून फरार झालेल्या पांडे टोळीच्या प्रेमवेड्या म्होरक्याची प्रेमातली अशीच एक चूक टोळीतील दोन सराईत गुंड पोलिसांच्या हाती लागण्यात कारणीभूत ठरली आहे. त्यामुळे प्रेयसीच्या मदतीने उत्तर प्रदेशातील कुख्यात पांडे टोळीने नागपुरात घातलेला सराफा दुकानातील यशस्वी दरोडा प्रेयसीबद्दलच्या प्रेमापायीच उघडकीस आला आहे.
नागपूरच्या नागसेननगर परिसरातले अवनी ज्वेलर्स या दुकानात 5 जुलैच्या दुपारी दरोडा पडला. दुकानात ग्राहक बनून आलेल्या चार दरोडेखोरांनी दुकानाचे शटर खाली करून बंदुकीच्या धाकावर दुकानातील सर्व सोने चांदीचे दागिने आणि तीन लाखांची रोकड लुटून नेली. भरदिवसा वर्दळीच्या भागात असलेल्या सराफा दुकानात पडलेला दरोडा नागपूरच्या कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण करणारा आणि पोलिसांची चिंता वाढवणारा होता. तडकाफडकीने पोलिसांची अनेक पथके चारही दिशेने रवाना करण्यात आली. मात्र, आरोपीबद्दल काहीच ठोस माहिती पोलिसांना मिळाली नाही.
सराफा व्यावसायिकाकडे विचारणा केल्यावर त्याने १ जुलै रोजी दुकानात दागिने खरेदी करायला आलेल्या एका तरुणीबद्दल शंका व्यक्त केली. कारण ते दोघे दागिने खरेदी करताना दुकानाचे बारीक निरीक्षण करताना दुकानातील सीसीटीव्हीमध्ये दिसून आले होते.
सराफा व्यावसायिकाकडून जोडप्याबद्दल शंका व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी त्या तरुण तरुणीचा शोध परिसरातील सर्वच सीसीटीव्हीमधून करायला सुरुवात केली. अवघ्या चार तासांच्या आत तब्बल 82 ठिकाणांवरील 400 तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. आणि त्यातून शंका असलेले जोडपे अवनी ज्वेलर्समध्ये खरेदीपूर्वी जवळच्या एका एटीएम सेंटरमध्ये गेल्याचे पोलिसांना कळले.
पोलिसांनी संबंधित एटीएम सेंटर मधून तरुण तरुणीने केलेले व्यवहार तपासले असता नागपूरची तरुणी उत्तर प्रदेशात असलेल्या एका गुन्हेगाराशी फोन आणि बँकिंग व्यवहारातून संपर्कात असल्याचे पोलिसांना कळले. आणि त्याच माहितीच्या माध्यमातून या प्रकरणाचा हळूहळू उलगडा होण्यास सुरुवात झाली.
पोलिसांनी संबंधित तरुणीची नागपुरात कसून चौकशी सुरु केली. मूळची उत्तर प्रदेशातील असलेली ती तरुणी सुरुवातीला फारशी माहिती पोलिसांना देत नव्हती. मात्र, 5 जुलैच्या रात्री तरुणीच्या मोबाईलमध्ये पांडे नावाच्या गुन्हेगाराचा एक मेसेज दिसून आला. त्या मेसेजमध्ये पांडेने तो आणि त्याची टोळी अवनी ज्वेलर्समधून तब्बल 22 लाखांची लूट केल्यानंतर मध्यप्रदेशात जबलपूर-कटनी रोडवर प्रेम लॉजमध्ये थांबल्याचे कळविले होते. मग काय नागपूर पोलिसांनी आपली सर्व पथके मध्यप्रदेशाच्या दिशेने रवाना केली.
मध्यप्रदेशातील कटनी पोलिसांना माहिती देण्यात आली. मध्यप्रदेश पोलिसांनी चारही आरोपी प्रेम लॉज मधून पळून जात असताना तिथे धाड टाकली. अनेक किलोमीटर पर्यंत दरोडेखोरांचा पाठलाग केला गेला. त्यात विरेंद्र यादव आणि दीपक त्रिपाठी नावाचे उत्तर प्रदेशातील दोन कुख्यात गुन्हेगारांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून काही प्रमाणात रोख रक्कम, लुटीच्या काही दागिन्यांसह 1 पिस्तूल आणि 2 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे तर टोळीचा म्होरक्या पांडे एका सहकाऱ्यासह फरार झाला आहे. लुटीचा बहुतांशी मुद्देमाल त्याच्याजवळ असून महाराष्ट्र्र आणि मध्यप्रदेश पोलीस दोघांचा शोध घेत आहे.
लवकरच लुटीचा मास्टरमाइंड आणि या टोळीचा म्होरक्या पांडे नावाचा उत्तरप्रदेश मधील गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागेल आणि या प्रकरणाबद्दल आणखी खुलासे होतील. मात्र, सध्या तरी प्रेयसीच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील दरोडेखोरांच्या टोळीने नागपुरात टाकलेला यशस्वी दरोडा प्रेमात प्रेयसीला केलेल्या मेसेजमुळे उघडकीस आला आहे.