नागपूर : नागपूर पोलिसांची संवेदनशीलता संपली आहे का? क्राईम सिटी आणि गुन्हेपूर अशी ओळख असलेल्या नागपुरातले पोलीस गावगुंडांऐवजी सामान्य नागरिकांवर मर्दुमकी दाखवत आहेत का? आम्ही असे प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे एका महिन्याच्या कालावधीत नागपूर पोलिसांवर दोघांचा जीव घेतल्याचा आरोप झालाय. सात जुलै रोजी पारडी परिसरात नाका-बंदी दरम्यान पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मनोज ठवकर या दिव्यांग ऑटोमोबाईल मेकॅनिक मृत्यूची सीआयडी चौकशी पूर्ण होण्याच्या आधीच काल रात्री नागपूर पोलिसांचा आणखी एक मारकुटं स्वरूप समोर आलंय. 


हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत सोमवारी कॉटर्स परिसरात राहणाऱ्या महेश राऊत नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी जबर मारहाण केली. कोणतीही चूक नसताना सार्वजनिरित्या पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे अपमानित वाटून घेऊन महेश राऊत यांनी रात्री उशिरा सेलफॉस हे विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली.



खोटी माहिती दिल्याचा आरोप करत महेशला मारहाण
क्वार्टर परिसरात राहणारे 37 वर्षांचे महेश राऊत एका खाजगी कंपनीत अकाउंटंट होते. शांत आणि हळव्या स्वभावाचे महेश यांना कोणावरही अन्याय झालेले पाहवत नव्हते. काल संध्याकाळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका मनोरुग्ण मुलाला एकाने मारहाण केली. लहानपणापासून पाहिलेल्या मनोरुग्ण मुलाला कोणी अशी मारहाण करत आहे, हे योग्य न वाटल्याने महेश यांनी शंभर नंबरवर कॉल करून पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. थोड्या वेळाने पोलिसांच्या दुचाकीवर दोघे पोलीस क्वार्टरमध्ये घटनास्थळी आले. त्यांनी येताच महेश राऊत यांना फोन केला. मात्र, तोपर्यंत महेश यांनी त्यांचा फोन घरी ठेवून दिला असल्याने त्यांनी पोलिसांचा कॉल उचलला नाही. तसेच मनोरुग्णाला मारहाणीचा प्रकारही शांत झाला होता. त्यामुळे महेशने खोटी माहिती दिली असा घटनास्थळी आलेल्या पोलिसांचा समज झाला. त्यांनी महेशचा शोध सुरु केला. 


उपचारादरम्यान महेशचा मृत्यू
पोलीस घटनास्थळी येऊन घटनेची, मारहाणीची माहिती न घेता थेट आपल्याला शोधत आहे हे पाहून महेशही घाबरून गेला. घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या दिलीप श्रीराव यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी महेशच्या घरी प्रवेश करत आम्हाला घटनास्थळी बोलावून आमचे फोन उचलत नाही असे सांगत घराबाहेर खेचून आणले आणि मारहाण सुरु केली. वस्तीत सर्वांच्या देखत झालेल्या मारहाणीमुळे सुशिक्षित असलेल्या महेश राऊतला अपमानित झाल्यासारखे वाटले. त्याने पोलिसांचा प्रतिकार केला. मात्र, पोलिसांनी त्याचे काहीही ऐकले नाही. पोलिसांनी त्याला मारहाण करत गल्लीच्या दुसऱ्या टोकावर नेले, त्याचा चष्माही फोडला. महेश यांचे लहान भाऊ शैलेश राऊत यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे महेश यांनी चांगल्या हेतूने पोलिसांना एका घटनेची माहिती दिली. मात्र, पोलिसांनी त्यालाच सर्वांच्या देखत मारहाण केल्यामुळे महेश नैराश्यात गेला आणि रात्री सर्व कुटुंबीय झोपल्यानंतर विषारी द्रव्य घेतले. आम्ही त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, आज सकाळी त्याचा मृत्यू झाला.


वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले 
दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून नियंत्रण कक्षाला आलेल्या फोननंतर दोन पोलीस घटनास्थळी गेले होते. मात्र, मनोरुग्णाला मारहाणीची कोणतीही घटना तिथे घडली नाही. तो फेक कॉल आहे अशी माहिती त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी फेक कॉल करणाऱ्या महेश राऊतला समज दिली आणि ते पोलीस ठाण्यात परत आल्याचा दावा केला आहे.  आम्ही या प्रकरणाची चौकशी करू. मात्र, प्राथमिक दृष्ट्या पोलिसांचे काहीच चुकले नाही, असा दावा ही झोन चारचे उपायुक्त अक्षय शिंदे यांनी केला आहे.


प्रत्यक्षदर्शींची एबीपी माझाला माहिती
क्वार्टर परिसरात ज्या गल्लीत ही घटना घडली. तिथे एबीपी माझाने अनेक नागरिकांकडे विचारणा केली. अनेकांनी पोलिसांचे अत्याचार डोळ्यांनी पाहिल्याचा दावा केला आहे. दोन्ही पोलिसांनी रागाच्या भरात महेश याला घरातून बाहेर खेचत मारहाण करत गल्लीच्या दुसऱ्या टोकापर्यंत ओढत नेल्याची माहिती दिली. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनेवर पडदा टाकण्याचे प्रयत्न करत आहेत का? असा प्रश्नही निर्माण झाला आहे. जर पोलीस यंत्रणेला घडलेल्या गुन्ह्याची, गैरप्रकाराची माहिती देणे चूक असेल आणि त्यासाठी त्याला सार्वजनिकरित्या अपमानित केले जात असेल तर कोण पोलिसांना मदत करेल? असे रास्त प्रश्न महेश यांचे मोठे बंधू योगेश राऊत आणि परिसरातील नागरिकांनी उपस्थित केले आहेत. 


पोलिसांच्या मारहाणीची ही पहिली घटना नाही
नागपुरात पोलिसांनी सामान्य नागरिकांना मारहाण केल्याची ही काही पहिली घटना नाही. 7 जुलैला नागपूरच्या पारडी परिसरात मनोज ठवकर या दिव्यांग व्यक्तीला मास्क आणइ हेल्मेट घातले नाही, या कारणासाठी नाकाबंदी लावलेल्या पोलिसांनी जबर मारहाण केली होती. त्यात मनोज ठवकर यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू असून ती पूर्ण होण्याच्या आधीच पोलिसांच्या मारहाणीचा गंभीर आरोप लागला असून पोलिसांनी अपमानित केल्याचे वाटून घेऊन पीडित व्यक्तीने आत्महत्या ही केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या "सदरक्षणाय खल निग्रहणाय" या ब्रीद वाक्यावर गंभीर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.