Nagpur News :  ताजबाग परिसरात अंमली पदार्थांची तस्करी करणारा तसेच अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना चकवा देऊन पसार झालेल्या कुख्यात आबू उर्फ फिरोज खान याला पोलिसांनी भंडाऱ्यातून अटक केली आहे.


मोक्काचा आरोपी आबू मध्य भारतात एमडीसह विविध अंमली पदार्थांच्या तस्करीचा मोठा रॅकेट चालवायचा. त्याला पोलिस उपायुक्त नुरुल हसन यांच्या पथकाने भंडाऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या वाडा परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्यावर आतापर्यंत 50 हुन जास्त गुन्हे दाखल आहेत. वारंवार जागा बदलून आबू हा पोलिसांना मागिल 7 महिन्यांपासून हुलकावणी देत होता.


आबूला अटक करण्यासाठी 5-5 पोलिसांचे दोन पथक तयार केले होते. याशिवाय त्याच्या लोकेशनसाठी सायबर सेल आणि इतर यंत्रणांचाही वापर केला होता. त्यानुसार गडचिरोली, भंडारा, अजमेर, मेहसना, अहमदनगर आणि अमरावती या ठिकाणी त्याचे लोकेशन अॅक्टिव्ह होते. पोलिसांनी पूर्ण फिल्डिंग लावल्यावरही हातात येणार तेवढ्यातच तो पसार व्हायचा.


अनेक पोलिसही आबूच्या 'पे रोल'वर?


अंमलीपदार्थांच्या तस्करीसह महाविद्यालयीन तरुण-तरणींना, बुकी आणि काही धनाड्यांना 'एमडी'चा पुरठा करणे, घरे-जमिनी हडपणे, दुकानदारांकडून खंडणी असे अनेक धंदे तो निर्भिडपणे चालवायचा. पोलिस कारवाईपासून संरक्षणासाठी त्याने पोलिस दलातील अनेक छोट्य-मोठ्यांना त्याने आपल्या 'पे-रोल'वर ठेवले असल्याची चर्चा होती. त्यामुळे आबू सोबत 'कनेक्टेड' असलेल्या अनेकांवर मागे कारवाई देखील झाली होती.


सायबर एक्स्पर्टची होती पाळत 


सात महिन्यांपासून पोलिस आबूच्या मागावर होते. त्याच्याशी कनेक्ट असलेल्यांवरही पाळत ठेवण्यात येत होती. यात त्यांचे  बँक व्यव्हार, सोशल मीडियावरही पोलिसांची पाळत होती. संधी मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.


५० पेक्षा जास्त गुन्हे


ताजबाग परिसरात वास्तव्यास असलेल्या आबु 'एमडी किंग' म्हणून ओळखला जातो. आमंली पदार्थांच्या तस्करीपासून तर खंडणी वसूल करणे, भुखंड-घरांवर अवैध ताबा या स्वरुपाचे 50 पेक्षा जास्त गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याची संपूर्ण टोळी वर्षभरापूर्वीच पोलिसांच्या रडावर आली होती. तेव्हा पासून या टोळीवर कठोर कारवाई करणे सुरु केले होते.