Nagpur Crime News: नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथून चोरीची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रामटेक तालुक्यातील देवलापार येथील ताज राईस मिल या औद्योगिक ग्राहकाकडील तब्बल 1 कोटी 2 लाख 23 हजार 894 रुपयांची वीज चोरी महावितरणच्या भरारी पथकाने उघडकीस आणली आहे.  या कारवाईत तडजोडीच्या रकमेपोटी 13 लाख 10 हजाराच दंड देखील ठोठविला आहे. संपुर्ण विदर्भात एवढ्या मोठ्या रकमेची वीज चोरी पहिल्यांदाच उघडकीस आली आहे. याप्रकरणी ताज राईस मिलचे शफ़िक अंसारी यांच्या विरोधात रामटेक पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003, सुधारीत 2007 च्या कलम 151 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या चोरीच्या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.


तब्बल 1 कोटी 2 लाख 23 हजार 894 चे महावितरणचे आर्थिक नुकसान


महावितरणचे पथक देवलापार येथील ताज राईस मिलचा विजपुरवठा व संच तपासणी करण्याकरिता गेले असता तेथे विज वापराची नोंद होण्यासाठी असलेल्या थ्री फेजच्या औद्योगिक विज मीटरला महावितरणचे सील नव्हते, सोबतच अतिरिक्त केबल जोडून वीज पुरवठा सुरू होता. या सर्व प्रकाराची योग्य शहानिशा करून ग्राहकाने अवैधरीत्या विज पुरवठा घेत मागील 12 महिन्याच्या कालावधीत 4 लाख 90 हजार 32 विज युनिटचा अवैध वापर करून तब्बल 1 कोटी 2 लाख 23 हजार 894 चे महावितरणचे आर्थिक नुकसान केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सध्या सुरू आहे.


मॅग्निज चोरीच्या वाहनासह दोघांना अटक


चिखला माईन्सच्या प्रतिबंधित क्षेत्रातून मॅग्नेजची चोरी करून त्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी नाकाबंदी करून अटक केली आहे. या कारवाईत विनानंबरची काळ्या रंगाची महिंद्रा गाडी आणि 20 प्लास्टिकच्या पिशव्यांमधील काळा मॅग्नीज असा सुमारे 4 लाख रुपयांचा हा मुद्देमाल गोबरवाही पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई भंडारा जिल्ह्यातील हिरापूर हमेशा गावाजवळ पोलिसांनी केली. आकाश नागपुरे (२४) रा. नाकाडोंगरी आणि जाफर शेख (३४) रा. चिखला या दोघांवर गुन्हे दाखल करून त्यांना गोबरवाही पोलिसांनी अटक केली. 


दरम्यान, अकोला जिल्ह्यातील चोहोट्टा बाजार येथील एका बारमध्ये मोबाईल चोरीची घटना घडलीय. मोबाईल चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा कैद झालाय. दारू पिण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाने हा मोबाईल लंपास केलाय. वाईन बारच्या काउंटरवरून या चोरट्याने हा महागडा आयफोन कंपनीचा सव्वा लाखांचा मोबाईल लंपास केलाय. चौकडीचा शर्ट घातलेल्या व्यक्तीने काउंटरवरील मॅनेजरला बोलण्यात गुंतवत सव्वा लाखांचा आयफोन लंपास केलाय. याबाबत बारमालकाने पोलीसात तक्रार दिलीये. पोलीस आता या चोरट्याचा शोध घेत आहेय.


ही ही वाचा