Nagpur Nag Vidarbha Chamber of Commerce News :  नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या (एनव्हीसीसी) वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या राडाप्रकरणानंतर माजी अध्यक्ष यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आता अध्यक्षांकडून पदाचा दुरुपयोग करीत, खोटी कागदपत्रे आणि बनावट बैठकांच्या मिनिट्सच्या माध्यमातून आर्थिक फायदा घेतल्याच्या माजी अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी (Nagpur Police) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.


गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये एनव्हीसीसीचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया, सचिव रामअवतार तोतला यांचा पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 साली अश्विन मेहाडिया एनव्हीसीसीच्या अध्यक्षपदी निवडून आले. मात्र, त्यांचा डायरेक्टर आयडेन्टीफिकेशन नंबर रजिस्ट्रार ऑफ कंपनीने ब्लॉक केला. त्यामुळे ते अपात्र झालेत. असे असतानाही त्यांनी ही बाब एनव्हीसीसीपासून लपवून निवडणूक लढवली.


त्यानंतर त्यांनी 'सर्टीफिकेट ऑफ ओरिजिन 3' संघटनेशी संबंध नसलेल्या मेहूल शाह याला दिले. त्यासाठी त्यांनी 300 ऐवजी 100 रुपये घेतले. त्याची सहमती असल्याचे सांगण्यासाठी त्यांनी बनावट झुम बैठक आणि कागदपत्रे तयार केलीत. तसेच संस्थेचे लेटरहेड, सील, स्टॅम्प वापरले. याशिवाय 100 कोटीची जमीन असताना, 2021 साली त्यांनी दोन कोटी रुपयांची जागा आणि अडीच कोटी रुपयांचे धनादेश एनव्हीसीसीला मिळवून दिले. यावेळी सदस्यांना न्यायालयाची भीती दाखवित या व्यवहारात कोट्यवधींचा अपहार करत एनव्हीसीसीची फसवणूक केली. त्यानुसार दीपेन अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी अश्विन मेहाडिया यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.


बैठकीतही झाला होता राडा


17 डिसेंबर रोजी झालेली आमसभा तसेच निवडणुकीवरून आजी आणि माजी पदाधिकाऱ्यांत संघर्ष उफाळला होता. त्यातून दीपेन अग्रवाल यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेचे रेकॉर्डिंग करता यावे, म्हणून माजी अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी मुकेश सगलानी आणि त्यांच्या चमूला बोलावले. रेकॉर्डिंग सुरू झाल्यावर अश्विन मेहाडिया यांनी शिवीगाळ करून धमकावले आणि रेकॉर्डिंग बंद पाडल्याची तक्रार दीपेन अग्रवाल यांनी दिली होती. त्यातून अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.


काय आहे वाद?


नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स (एनव्हीसीसी ) च्या 11 माजी अध्यक्षांनी वर्तमान अध्यक्ष आश्विन मेहाडिया यांच्या डीन नंबरचा मुद्दा उपस्थित करीत लेटर बॉम्ब टाकला होता. दरम्यान, सात दिवसांच्या आत उत्तर देण्याची कालमर्यादा दिली होती. या पत्रावर एनव्हीसीसीच्या सात डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान, दोन्ही पक्षांनी आमने- सामने बसून यावर तोडगा काढावा असे निश्चित करण्यात आला. बैठकीत पाच ते सहा सदस्यांनी आपले मत व्यक्त केले. त्यानंतर अंतिम निर्णय अश्विन मेहाडिया घेतील असे सांगून संपूर्ण प्रकरण त्यांच्याकडे त्यांच्या कोर्टात टाकले. बैठकीत मेहाडिया यांनी सांगितले होते की, शक्‍यतो हे प्रकरण चर्चेतून सुटणारे नाही. माजी अध्यक्ष न्यायालयात जातील तर आम्ही सुद्धा त्यांना न्यायालयातच उत्तर देऊ. दरम्यान, माजी अध्यक्षांच्या विरोधात कठोर शब्दांचा प्रयोग केले होते. त्यानंतर वाद आणखी चिघळला.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Nagpur to Goa Train : गोव्याला जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज; नागपूर-मडगाव स्पेशल एक्सप्रेस जुलैपर्यंत