Nagpur Crime : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मकोका) कारागृहातून सुटताच कुख्यात गुंड सुमित ठाकूर (Sumit Thakur) याने इन्स्टाग्रामवर रिल (Instagram Reel) अपलोड केली होती. आता कुख्यात गुंड सुमित ठाकूरला रील बनवणे चांगलेच भोवले आहे. पोलिसांनी (Police) सुमित ठाकूरला पुन्हा एकदा बेड्या ठोकून त्याची रवानगी तुरुंगात केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ऑक्टोबर 2023 च्या अपहरण आणि गंभीर जखमी केल्याच्या प्रकरणात सुमित ठाकूर सह इतर चार आरोपींवर मकोका कारवाई करण्यात आली होती. मकोकाअंतर्गत कारवाई झाल्याने सुमित ठाकूर हा नागपुरातून पसार झाला होता. काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी त्याला जेरबंद केले होते. मकोकामध्ये जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सुमित ठाकूर त्याच्या साथीदारांसह गाड्यांच्या ताफा घेऊन निघाला.
सुमित ठाकूरला पुन्हा अटक
त्याच्या साथीदारांनी याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. ‘वेलकम भाई, बाप तो बाप रहेगा’ अशी टॅगलाइन देत इन्स्टाग्राम रिल अपलोड अपलोड करण्यात आली. ही रील व्हायरल होताच पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी याबाबत गंभीर दखल घेतली. सुमितविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी सायबर पोलिसांना दिले. त्यानंतर सायबर पोलिसांनी सुमितविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा पुन्हा अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, 16 ऑक्टोबर 2023 ला सुमित व त्याच्या साथीदारांनी कमल अनिल नाईक (३३) याचे पिस्तुलाच्या धाकावर अपहरण करून त्याला एका गोदामात मारहाण करून सोडले होते. याप्रकरणी पोलिसांनी सुमित व त्याच्या साथीदारांविरुद्ध अपहरणासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्याने सुमित व त्याचे साथीदार संतापले होते. 22 ऑक्टोबरला दुपारी12 वाजेच्या सुमारास सुमितच्या साथीदाराने कमलच्या मोबाइलवर संपर्क साधला. यावेळी कमलला धमकी देऊन पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला गेला. 23 ऑक्टोबरला त्याला न्यायालयात बोलाविले. जिवाच्या भीतीने कमल हा मित्रांसह न्यायालयात गेला. एका वकिलाने कमलला स्टॅम्पपेपर दिला. त्यावर स्वाक्षरी करण्यास सांगितले. कमलने स्वाक्षरी केली. त्यानंतर कमलने जरीपटका पोलिसांत तक्रार दिली. सुमित आणि त्याच्या सहकाऱ्यांवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. जवळपास चार महिने फरार राहिलेल्या सुमितला पोलिसांनी अटक केली होती. त्याला मकोका प्रकरणात सशर्त जामीन मिळाला होता. मात्र जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर रील बनवणे कुख्यात गुंड सुमित ठाकूरला चांगलेच भावले आहे.
आणखी वाचा