मुंबई : शहरातील मालाड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून आरोपी प्रियकराने पीडित महिलेच्या घरी सेक्स टॉय पाठवले. इतकेच नाही तर एका पॉर्न साईटवर महिलेचा नंबरसुद्धा कॉल गर्ल म्हणून पोस्ट केला. 


एके दिवशी अचानक पीडित महिलेच्या घरी एक पार्सल आलं ते पार्सल उघडल्यावर पीडित महिलेला आणि तिच्या घरच्यांना धक्काच बसला. घरच्यांनी जेव्हा पार्सल उघडलं तेव्हा त्यात एक सेक्स टॉय होत. 2 फेब्रुवारी 2019 रोजी पीडित महिलेने मालाड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत यासंदर्भात गुन्हा नोंदवला आणि युद्धपातळीवर तपास सुरू केला.


आरोपी व्यक्तीने हा गुन्हा करण्यासाठी XYZ या अश्लील पॉर्न वेबसाईटवर तसेच सेक्स टॉईज विकणाऱ्या कामसूत्र डॉट कॉम या साइटवरून सेक्स टॉय ऑर्डर केले. या दोन वेबसाईटचा वापर करून हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झालं. आपला गुन्हा पकडला जाऊ नये म्हणून आरोपीने अतिशय चालाकीने तांत्रिक बाबींचा वापर केला, स्वतःचे अस्तित्व लपवण्यासाठी वर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (VPN) अॅप्लिकेशनचा वापर करून स्वतःचा आयपी अड्रेसे बदलून हा गुन्हा केल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.


या आरोपीला पकडण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक विवेक तांबे आणि त्यांच्या सायबर पथकाने सतत पाच महिने तक्रारदार महिलेच्या परिसरातील इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीकडून तांत्रिक दृष्ट्या क्लिष्ट डेटा प्राप्त करून त्याचा अभ्यास करून त्यानंतर वरील वेबसाईट्सला नियमित भेट देणाऱ्यांचा शोध घेत 26 वर्षीय या आरोपीला मालाड येथील लिबर्टी गार्डन येथुन त्याला अटक केली, अटक करतेवेळी त्याने गुन्ह्यासाठी वापरलेला त्याचा मोबाईल आणि इंटरनेट राउटर पोलिसांनी जप्त केला आहे.


एकतर्फी प्रेमातून हा गुन्हा केल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्हा करण्यासाठी आरोपीने तांत्रिक पद्धतीतचा पुरेपूर वापर केला होता. त्यामुळे पोलिसांना या गुन्ह्याचा छडा लावण्यास पाच महिने लागले. मात्र, पाच महिन्यात पोलिसांनी रात्रीचा दिवस केला आणि डोळ्यात तेल टाकून या प्रकरणाचा तपास सुरूच ठेवला. आणि शेवटी त्यांच्या या प्रयत्नांना यश आले.


हा तपास अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ उत्तर प्रादेशिक विभाग, सहायक पोलीस आयुक्त दीपक फटांगरे गोरेगाव विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली व मालाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक तांबे, पोलीस उपनिरीक्षक वायकोस, रेडकर, पोलीस हवालदार अशोक कोंडे या पथकाद्वारे पार पार पडली.