मुंबई : मुंबईचा करोडपती फेरीवाला! ज्याकडे मुंबईत 10 घरे, गावी 2 ठिकाणी जमीन, 5 एकर शेती, घरात दीड किलो सोने, एक फॉर्च्युनर आणि एक बरेलो गाडी, एक बुलेट बाईक, 8 ते 10 लाखाच्या इन्शुरन्स पॉलिसी याशिवाय 30 वेगवेगळ्या बँक खात्यात 12 ते 13 लाख रुपयांची गंगाजळी! अशा या संतोषकुमार सिंग उर्फ बबलू ठाकूर या मास्टरमाइंड फेरीवल्याला दादर रेल्वे पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.  त्याच्यासह त्याची पत्नी आणि इतर 6 आरोपींवर मकोका कायदा लावलाय. याने इतका पैसा कसा गोळा केला? वाचा त्याचीच कहाणी...


दहशतीच्या छायेत गेली दहा बारा वर्षे दादर स्टेशनचे सर्व फेरीवाले जगत होते. त्यांना धंदा करायचा असेल तर प्रत्येक दिवसाची प्रोटेक्शन फी द्यावी लागायची, ही फी जबरदस्ती वसूल केली जायची, आणि नाही दिली तर सर्वांसमोर लाथा बुक्क्याने आणि प्रसंगी चाकू सुऱ्याने वार केले जायचे. मात्र भीतीच्या वातावरणात धंदा करणाऱ्या या फेरीवाल्यांना आता मात्र मोकळा श्वास घ्यायला मिळतोय. कारण संतोषकुमार सिंग उर्फ बबलू ठाकूर आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.


हे भीतीचं साम्राज्य उभं केलं होतं संतोषकुमार सिंग उर्फ बबलू ठाकूर या गुंड फेरीवल्याने... काही स्थानिक गुंडांना सोबत घेऊन या बबलू ठाकुरने असे काही साम्राज्य तयार केले होते. त्याला पैसे दिल्याशिवाय फक्त दादरच नव्हे तर सीएसएमटी, भायखळा, कुर्ला, ठाणे आणि कल्याण स्टेशन परिसरात देखील कोणी नवीन धंदा सुरू करू शकत नव्हते. पण प्रत्येक काळ्या साम्राज्याचा अंत हा कधी न कधी होतोच.


हा बबलू ठाकूर स्वतः देखील एक फेरीवलाच होता. पण त्याच्या जवळील प्रचंड बुद्धिमत्तेचा वापर त्याने एक असं रॅकेट उभं करायला केला की पोलीस देखील भांबावून गेले. 2005 ला पहिल्यांदा बबलू मुंबई मध्ये आला. त्यानंतर त्याने याच दादर स्टेशनच्या ब्रिजवर दाढी करण्याचे ब्लेड विकायला सुरुवात केली. हळूहळू तो दारू विकू लागला. त्यामुळे त्याचा संबंध स्थानिक गुन्हेगारांशी आला. अशा गुन्हेगारांना सोबत घेऊन त्याने स्वतःची गॅंग उभी केली आणि याच गॅंगचा आधारे काही वर्षात तो दादर च्या सर्व पादचारी पुलांवर आणि पूर्व आणि पश्चिमेकडील स्टेशन लगतच्या सर्व जागांवर फेरीवाल्यांकडून हप्ते वसुली करू लागला. ही माहिती दादर रेल्वे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिली.


दादर स्टेशनच्या आसपास असणाऱ्या प्रत्येक फूटभर जागेचे पैसे ठरलेले होते. तर ब्रिजवर धंदा करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागायचे. तीन फुटाच्या जागेवर धंदा करायचा असल्यास दिवसाला शंभर ते पाचशे रुपये तर मोक्याच्या जागी धंदा करायचा असल्यास दिवसाला पाच हजार रुपयांपर्यंत हफ्ते बबलू ठाकुर याला द्यावे लागत होते. नाही दिले तर मारहाण. जर कोणी मारहाणीचा गुन्हा दाखल केला तर त्याच्याच विरोधात बबलू ठाकुरची माणसे मारहाणीचा गुन्हा दाखल करायची. नाहीतर कोर्टात केस जाईपर्यंत साक्षीदाराला किंवा फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देऊन केस मागे घ्यायला लावायचे, असे नाव न सांगण्याच्या अटीवर दादरच्या फेरीवाल्यांनी एबीपी माझाला सांगितले. 2005 पासून 2021 पर्यंत याच एका माणसावर 25 केसेस दाखल झाल्या मात्र एक केस सोडून इतर कोणत्याही केसमध्ये त्याला साधी शिक्षा देखील झाली नाही. त्याला 2 वेळा तडीपार देखील करण्यात आले पण त्याचाही फायदा नाही. बबलू ठाकुरचे प्रस्थ वाढतच गेले. 


2005 साली शेविंग ब्लेडस विकून पोट भरणारा बबलू ठाकूर आजच्या तारखेला करोडपती फेरीवाला बनला. दिवसाला लाखोंचे कलेक्शन करून त्याने मुंबईत दादर, परेल, तुर्भे, कल्याण अश्या ठिकाणी 10 घरे स्वतःच्या आणि पत्नीच्या नावे खरेदी केली. ज्यांची किंमत आताच्या घडीला 10 कोटींपेक्षा जास्त आहे. दीड किलो सोने त्याकडे पोलिसांना सापडले. एक फॉर्च्युनर कार, एक बलेरो कार आणि एक बुलेट बाईक त्याकडे होती. सुल्तानपूर इथे मोठे घर, 5 एकर जमीन देखील याच्या नावावर आहे. तसेच 8 ते 10 लाखाच्या इन्शुरन्स पॉलिसी आणि तब्बल 30 बँक खाते त्याचे आहेत. ज्यात 10 ते 12 लाख रुपये पोलिसांना सापडले आहेत. त्याच्या इतर मालमत्तेचा शोध पोलीस अजून घेत आहेत. 


बबलू ठाकूर इतका शातीर होता. हे दादर रेल्वे पोलिसांना समजले त्यामुळे, त्याच्या विरोधात झालेल्या एफआयआरपर्यंत ते थांबले नाहीत तर त्यावर आणि त्याच्या पत्नी सह इतर 6 साथीदारांवर मकोका कायदा लावून दादर रेल्वे पोलिसांनी त्याचे सुटण्याचे सर्व मार्ग बंद केले. मात्र त्यातही तो मुंबई सोडून पळून जाताना मोठा शिताफीने पोलिसांनी त्याला मुलुंड टोल नाक्यावर अटक केली, असे दादर रेल्वे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी एबीपी माझाला सांगितले.


बबलूची गॅंग 
बबलू फक्त आपल्या गॅंगला महिन्याला दीड लाख पगार द्यायचा, पोलिसांनी त्यांना देखील मकोका खाली अटक केली आहे. 


1. बबलू ठाकूर




2. रिटा सिंग 




3. लता पवार




4. विजय भुतेकर




5. पंकेश भोसले



6. दीपाली कामठे




7. समीर लालझरे





8. संजय मोहिते



आधी बबलू ठाकूर विरोधात तक्रार देण्यासही कोणी येत नव्हते पण आता तब्बल 70 फिर्यादी आणि साक्षीदार पोलिसांकडे आहेत. त्यामुळे यावेळी बबलू सुटण्याची शक्यता फारच कमी आहे. तरीही पोलिसांना बबलूच्याही वर असलेल्या मास्टरमाइंडचा शोध घ्यायचा आहे.