मुंबई: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं बुधवारी बेकायदेशीर लॉटरी आणि सट्टेबाजांवर मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेनं घाटकोपरमध्ये चार दुकानांवर छापेमारी करत आठ जणांना अटक केलीय तर इतर आठ लोकांना ताब्यात घेतलं आहे. तसंच रोख रक्कम आणि इतर साहित्यही जप्त केलं आहे.
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिासांना मिळालेल्या एका गुप्त माहितीच्या आधारे ही छापेमारी करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकाने घाटकोपरमधील चार दुकानांवर छापा टाकला. ही सर्व दुकाने अवैधरित्या कुठल्याही परवान्याविना चालवण्यात येत होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार शहरात अनेक ठिकाणी अवैधरित्या लॉटरीची दुकानं सुरू आहेत. या सर्व दुकानांवर पोलिसांची करडी नजर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक ओतारी आणि पोलीस पथक यांनी दोन पंचांसह घटनास्थळी जाऊन छापेमारीची कारवाई केली असता आरोपी क्रमांक , वय 40 वर्षे आणि आरोपी क्रमांक 02, वय 44 वर्षे हे GC Coupon-1 नावाची बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी हे त्यांच्या आस्थापनेमध्ये चालवित असताना मिळून आले. तसेच इतर आठ जण हे घटनास्थळी सदरची बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी खेळताना आढळून आले. त्यावेळी लॉटरी शॉपचा चालक, एजंट व लॉटरी खेळणारे आठ जण असे एकूण 10 जणांना बेकायदेशीर लॉटरी खेळण्याचे साहित्य आणि रोख रक्कम 12,450 रुपयांसह ताब्यात घेवून त्यांच्याविरुद्ध वर नमुद प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा करीत आहे.
जुगार अड्डा चालवणारे मुख्य व्यक्ती मुंबई गुन्हे शाखेच्या रडारवर
दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून जुगार अड्ड्यांवर छापेमारी करुन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सुमारे 14 गुन्हे दाखल केले आहेत. जुगार खेळणाऱ्या किंवा आकडे आणि नंबर घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु जुगाराचा अड्डा चालवणारे मुख्य आरोपी कोणत्याही खटल्याशिवाय मोकाट फिरत आहेत. त्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने विशेष सेल तयार केला आहे. हा सेल बेकायदेशीरपणे जुगार अड्डा चालवणाऱ्यांवर कारवाई करणार आहे.
मटका आणि जुगार चालवणाऱ्या मोठ्या जुगारींचाच बंदोबस्त केल्यास शहरात चालणाऱ्या मटक्याला आळा बसेल असं वरिष्ठ पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे शहरातून मटका आणि जुगार हद्दपार करण्यासाठी पोलीस ठाण्याबरोबर गुन्हे शाखा देखील मैदान उतरले असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं.
महत्त्वाच्या बातम्या:
- Mumbai Crime : पॅन कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने मुंबईतील इसमाची फसवणूक, गुजरातमधून चौघे अटकेत
- Lottery News : 'भगवान देता है तो छप्पर फाड के...'; एकाच नंबरवर दोन वेळा लागली लॉटरी, 50 लाखांचं बक्षीस
- Viral News : पोलीस हवालदाराचे नशीब पालटले, झाला कोट्यधीश! आईच्या सांगण्यावरून खरेदी केले होते तिकीट