मुंबई : जन्मठेपेची शिक्षा झाल्यावर 13 वर्षांपासून पॅरोलवरून फरार झालेल्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Police) अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष 5 यांनी ही कारवाई केली असून अटक आरोपी अशोक हनुमंता कजेरी उर्फ व्ही. शिवा नरसीमुल्लू (वय 39 वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. सदरचा आरोपी हा तेलंगणात वेशांतर करून नाव बदलून राहत होता.


धारावी पोलीस ठाण्यात सन 2007 मध्ये दाखल गुन्हा कलम 302 प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली होती. सन 2008 साली सत्र न्यायालय, मुंबई यांनी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून आरोपी अशोक कजेरी हा नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह येथे जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. 


30 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला आणि फरार झाला 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यास सन 2011 मध्ये 30 दिवसांच्या पॅरोल रजेवर सोडण्यात आले होते. त्यानंतर आरोपी वेळेत कारागृहात हजर न होता फरार झाल्याने नाशिक मध्यवती कारागृहातील तुरुंग अधिकाऱ्यांनी आरोपीविरुद्ध धारावी पोलीस ठाणे कलम २244 प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.


मुंबई गुन्हे शाखेने गुन्हेची गंभीरता लक्षात घेत आरोपीचा शोध सुरू केला आणि नाशिक, हिंगोली, परभणी, जालना तसेच केरळ राज्यात वारंवार कसून शोध घेतला. पण तो मिळून आला नाही. त्याच बरोबर तांत्रिकरित्या शोध घेत असताना सदर आरोपीत इसम हा तेलंगणा राज्यातील महबूबनगर येथे व्ही. शिवा नरसीमुल्लू असे नाव बदलून तसेच वेशांतर करून लपून असल्याचे आढळून आले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माळी आणि पथकाने महबूबनगर, तेलंगणा येथे जाऊन गोपनीय सूत्रांमार्फत शोध घेतला. त्या ठिकाणी सापळा रचून फरार शिक्षाबंदी आरोपीस ताब्यात घेवून त्यास अटक केली. 


अशाप्रकारे नाशिक मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आणि मागील 13 वर्षापासून पॅरोलवरून फरार झालेल्या आरोपीचा कोणत्याही प्रकारचा सुगावा लागत नसताना तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे कक्ष  5 यांनी अथक परिश्रम घेवून फरार शिक्षाबंदी आरोपीस अटक केली आहे.


ही बातमी वाचा: