Mumbai Police  : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं केलेल्या मोठ्या कारवाईत मुंबईतल्या पाच बांधकाम व्यावसायिकांना (Mumbai Police action against 5 Builder) अटक करण्यात आली आहे. पाच विकासकांना मुंबईतल्या तीन वेगवेगळ्या फसवणुकीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मंगेश सावंत, जयेश रामी, जयेश शाह, अश्विन मिस्त्री आणि राजेश सावला अशी या बांधकाम व्यावसायिकांची नावं आहेत. लोकांकडून फ्लॅटसाठीची रक्कम घेऊनही त्यांना फ्लॅट न दिल्याच्या आरोपाखाली या पाचजणांना अटक करण्यात आली आहे.


पहिल्या FIRमधील प्रकरणात अटक केलेल्या जयेश शाहविरुद्ध मुंबई आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला. शाहवर आरोप आहे की, पैसे घेऊनही जवळपास 100 लोकांना घरं दिली नाहीत. शाह विरुद्ध फसवणुकीचे 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  


दुसऱ्या FIRमधील आरोपी राजेश सावला, अश्विन मिस्त्री, जयेश रामी या तिघांविरुद्ध 23 एप्रिल 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी 65 वर्षीय अनिल हळदनकर नावाच्या व्यक्तीला एक फ्लॅट 76 लाखांना विकला होता. मात्र अनिल हळदनकर यांना नंतर माहिती मिळाली की तोच फ्लॅट आधीच कुणाला तरी विकलेला आहे. राजेश सावला, अश्विन मिस्त्री, जयेश रामी या तिघांविरोधात याच प्रकारचे फसवणुकीचे एकूण 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  


तिसऱ्या FIR मधील आरोपी मंगेश सावंतलाही अटक केली आहे. सावंत विरोधात 23 मे 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावंतनं रमाकांत जाधव नावाच्या व्यक्तिकडून बिल्डिंग बांधण्यासाठीच्या एका कामात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली 15 कोटी रुपए घेतली आणि काम पूर्ण केलं नाही. या फसवणुकी प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केलं आहे.  


या पाचही बिल्डरांना ग्राहकांची फसवणूक करण्याच्या आरोपाखाली अटक केलं आहे. अशा प्रकारे एकाच वेळी पाच व्यवसायिकांवर अशा प्रकारे कारवाई केल्याने बिल्डरांचे धाबे दणाणले आहेत.