मुंबई : कर्जबाजारीपणाला कंटाळून मुंबईतील (Mumbai) अंधेरी (Andheri) परिसरातील वर्सोवा पुलावरुन एका इसमाने उडी मारुन त्याचं आयुष्य संपवलं. दरम्यान सध्या पोलीस (Police) आणि अग्निशमन विभागाकडून शोधकार्य सुरु करण्यात आलंय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं. कर्जाला कंटाळून या इसमाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सध्या पोलिसांकडून देण्यात येतेय.
मुंबईतील भाईंदर परिसरात राहणाऱ्या अतुल धांडिया वय 52 वर्ष हे रविवारपासून घरी आले नव्हते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार भाईंदर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ शोधण्यास सुरुवात केली. त्याच वेळी म्हणजेच बुधवार 27 डिसेंबर रोजी धांडिया यांच्या भावाने ते वर्सोवा पुलावर दुचाकी जवळ उभे असल्याचं पाहिलं. पण भावाला समोर पाहताच त्यांनी त्याच पुलावरुन खाली उडी मारली.
अतुल यांनी ज्यावेळी पाण्यात उडी मारली त्यावेळी ओहोटीची वेळ होती. त्यामुळे पाण्यातून वाहत जात असल्याचं अतुल यांच्या भावानं पाहिलं. त्यांच्या भावाने तातडीने पोलीस स्थानकात धाव घेतली. त्यानंतर काशिमीरा पोलीस आणि अग्निशमन विभागाने त्यांचा शोध सुरु केला. पण 24 तास उलटले तरीही त्यांचा शोध लागलेला नाही. अतुल धांडिया बोरीवलीतील खासगी कंपनीत कामाला होते. मात्र कर्ज असल्यामुळे ते मानसिक तणावाखाली होते. याच तणावामुळे त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचलले असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
यवतमाळ MBBS विद्यार्थीनीची आत्महत्या
यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (Shri Vasantrao Naik Government Medical College Yavatmal) येथील एका एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सुहानी ढोले अस मृत विद्यार्थिनीचे नाव असून या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना काल, 28 डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत विद्यार्थिनी यवतमाळच्या वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून आत्महत्यांचे कारण अद्याप कळू शकले नाही. या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.