वसई : शेजारी राहणारी लहान मुलगी चिडवते म्हणून अल्पवयीन मुलाने शेजारी राहणाऱ्या मुलीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. बंद घरात शाळकरी मुलीचा मृतदेह आढळल्याने वसई विरारमध्ये (Vasai - Virar Crime News) एकच खळबळ उडाली होती. पेल्हार पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही घटना आरोपी मुलाच्या वडिलांनी माहिती असूनही त्यांनी ही माहिती लपवली. मुलाने हत्या केल्यानंतर आरोपीच्या वडिलांनी मुलीचा मृतदेह बाजूच्या घरात टाकल्याची माहिती समोर आली आहे. सध्या अल्पवयीन मुलगा फरार असून आरोपी मुलाच्या वडिलांनी पोलिसांनी (Vasai Murder) अटक केली आहे.
वसईतील वसई फाटा येथे 4 डिसेंबरला एका आठ वर्षीय चिमुकलीचा मृतदेह बंद घरातील मोरीत आढळून आला. तिचे पाय नायलॉनच्या बेल्टने बांधलेल्या स्थितीत होते. मृत चिमुरडी आठ वर्षीय होती. ती जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत शिकत आहे. 1 डिसेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या दरम्यान घराजवळील दुकानात आईस्क्रिम आणण्यासाठी दुकानात गेली आणि त्यानंतर ती अचानक गायब झाली. त्याबाबत मिसिंग तक्रार 1 डिसेंबर रोजी तिच्या वडिलांनी पेल्हार पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
चिमुकलीचा मृतदेह गळा दाबून मारल्याचा प्राथमिक अंदाज
घरच्यांनी चिमुकलीचा शोध घेणाऱ्या व्यक्तीला 20 हजाराची रक्कम ही देण्याचे जाहीर केले होते. 4 डिसेंबरला सकाळी 11 च्या दरम्यान जिल्हा परिषदेच्या मागील एका चाळीत चिमुकलीचा मृतदेह आढळला. पाच नंबर बंद रुममध्ये मोरीत एका प्लास्टिकच्या गोणीत पाय बांधलेल्या अवस्थेत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला होता.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन अहवालासाठी पाठवण्यात आला. चिमुकलीचा मृतदेह गळा दाबून मारल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
मुलाला वाचवण्यासाठी वडिल मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत
पोलिसांनी अधिक तपास केल्यावर, त्याच परिसरातील एक अल्पवयीन मुलगा गायब असल्याचे कळलं. पोलिसांनी त्या मुलाचे वडिलांजवळ चौकशी केली असता खुनाच्या हत्येचा उलगडा झाला आहे. मृत मुलगी शेजारी राहणाऱ्या मुलाला शेंबड्या शेंबड्या चिडवत होती. रागाच्या भरात 1 डिसेंबरला त्याने तिचा गळा दाबून हत्या केली. त्याने ही घटना वडिलांना सांगितली. वडिलांनी घटना लपवण्यासाठी चिमुकलीचा मृतदेह बंद खोलीमध्ये ठेवून त्याची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत होते. सध्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे तर आरोपी अल्पवयीन मुलागा ही जालना येथे सापडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.