Mumbai Crime : लहान मुलांकडे पाहून अश्लील हावभाव करणाऱ्या एका टॅक्सी चालकाला (Taxi Driver) पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील (Mumbai) कुलाबा परिसरातील ही घटना आहे. सिकंदर खान (वय 35 वर्ष) असं आरोपीचं नाव आहे. तीन लहान मुलांसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
कुलाबा पोलिसातील सूत्रांच्या माहितीनुसार, अटकेतील आरोपी दररोज कुलाबा परिसरातील मुलांच्या शाळेसमोर आपली टॅक्सी उभी करत असे आणि त्यांना पाहून अश्लील हावभाव करत असे. एवढंच नाही तर तो मुलांचा पाठलागही करत असे.
याची माहिती पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलींनी आपल्या वर्ग शिक्षकांना दिली. त्यानंतर शिक्षकांनी याची खात्री करुन घेण्यासाठी स्वत: बाहेर जाऊन पाहिलं. मुली सांगितलेली बाब खरी असल्याची पटल्यानंतर शिक्षिकेने याची माहिती कुलाबा पोलिसांना दिली. संबंधित टॅक्सी चालकाविरोधात तक्रार केली.
या तक्रारीची दखल घेत कुलाबा पोलिसांनी टॅक्सीच्या नंबरद्वारे आरोपी सिकंदर खानचा शोध घेतला. त्याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 354 (ड), 509 आणि पॉक्सोच्या कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
कांदिवलीत सह वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत
सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कांदिवली पश्चिम परिसरात घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना 9 ऑक्टोबर रोजी घडली होती. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, अत्याचारानंतर चिमुकलीला मारहाण केली आणि या घटनेची वाच्यता न करण्याची धमकी दिली होती.
पीडित चिमुकली तिच्या घराजवळच खेळत होती. यावेळी 46 वर्षीय आरोपी तिथे आला. त्याने मुलीला पकडलं आणि निर्जन स्थळी घेऊन गेला. यानंतर तिच्यावर अत्याचार केले. सोबतच तिला मारहाण केली आणि घरातील कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. मात्र मुलीने याची माहिती आईला दिली. आईने मुलीला घेऊन कांदिवली पोलीस स्टेशन गाठलं, जिथे तिच्या तक्रारीवरुन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीविरोधात आयपीसीच्या कलम 376 (बलात्कार) आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक केली.
शाळकरी मुलीची ओढणी खेचल्याने आरोपीला 3 वर्षांचा तुरुंगवास
तर मुंबईतील आणखी एका घटनेत विशेष न्यायालयाने 20 वर्षीय तरुणाला "लैंगिक हेतूने" शाळेत जाणाऱ्या मुलीचा "ओढणी" खेचल्याबद्दल तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकारामुळे पीडित आणि तिच्या कुटुंबियांच्या मनात दहशत निर्माण होत असल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे.