मुंबई: मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयाकडून सलग दुसऱ्या दिवशी फाशीचा आणखीन एक निर्णय देण्यात आला आहे. सन 2019 च्या जुहू बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आला. जुहूमध्ये एका नऊ वर्षीय बालिकेचं अपहरण झाल्यानंतर तिची हत्या झाली होती. प्रकरणीच्या खटल्यावर आज निकाल देण्यात आला.


जुहूमध्ये 4 एप्रिल 2019 रोजी एका नऊ वर्षीय बालिकेचं अपहरण झाल्यानंतर तिचा मृतदेह एका गटारात सापडला होता. शवविच्छेदनात हत्येआधी बलात्कार झाल्याचं उघड झालं होतं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी गुंडाप्पा चीनतंबी देवेंद्र याला अटक केली होती. आरोपीने त्या मुलीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केला होता. नंतर त्या मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह गटारात फेकला होता. 


ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर जुहू परिसरातील लोकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्यावर पोक्सोसह आयपीसी कलम 302, 376, 363, 201 अंतर्गत दाखल करण्यात आला होता. 


साकीनाका बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा
राज्याला हादरवून सोडणाऱ्या साकीनाका बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपी मोहन चौहानला दिंडोशी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं सांगत राज्य सरकारच्या वतीने आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.


वर्षाच्या आत खटल्याचा निकाल
या प्रकरणाचा जलद गतीने तपास करत केवळ एका वर्षाच्या याचा निकाल लावण्यात आला आहे. गणेश चतुर्थीच्याच दिवशी मुंबईत घडलेल्या साकीनाका बलात्कार प्रकरणानं संपूर्ण मुंबई हादरली होती. या प्रकरणातील नराधम मोहन चौहानला पोलिसांनी काही तासांतच अटक केली. 


पीडितेला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी हा खटला जलदगतीनं चालविण्यात येईल, असं आश्वासन खुद्द मुख्यमंत्र्यानी जनतेला दिलं होतं. त्यानुसार मुंबई पोलिसांनी अवघ्या 18 दिवसांत या प्रकरणाचा तपास पूर्ण करत आपलं आरोपपत्र दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल केलं होतं. 


एकूण 346 पानांच्या या आरोपपत्रातील माहितीनुसार, पीडित महिला ही आरोपीला आधीपासूनच ओळखत होती. गुन्हा घडला त्याच्या 25 दिवस आधीही आरोपीनं महिलेला भेटण्याचा आणि संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळेच बऱ्याच कालावधीनंतर ती त्याला भेटली तेव्हा रागाच्या भरात नराधमानं तिच्यासोबत हे अमानुष कृत्य केलं. यात लोखंडी सळीचाही त्यानं वापर केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.