Mumbai Crime : मुंबईत एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी या प्रकरणी एका भोजपुरी अभिनेत्रीला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यामध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का याचा तपास पोलिस करत आहेत. 


मुंबई गुन्हे शाखेच्या समाजसेवा शाखेला गोरेगाव येथील रॉयल पाम हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापेमारी केली. यावेळी तीन मॉडेल्सची सुटका करण्यात आली असून त्यांना या काळ्या धंद्यात जबरदस्तीने ढकलण्यासाठी कारणीभूत असलेल्या एका दलाल महिलेला अटक केली आहे. अटक करण्यात आलेली ही महिला ही भोजपुरी अभिनेत्री आहे. 


भोजपुरी अभिनेत्रीला पोलिसांनी तिला अटक केली आहे. या प्रकरणी आणखी एका आरोपीच्या शोधात पोलिस आहेत. आरोपी महिलेने आरे पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका प्रसिद्ध हॉटेल येथे हा व्यवसाय सुरु केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 


पोलिसांनी शुक्रवारी दुपारी सदर ठिकाणी छापा टाकला असता हे रॅकेट उघडकीस आलं. आरोपी महिला भोजपुरी फिल्म सृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री असून तिने 'लैला मजनू' या भोजपुरी फिल्ममध्ये तसेच 'जॉमेस्टिक बॉक्स' या वेब सिरीज आणि 'बाप नंबरी बेटा दस नंबरी' या भोजपुरी कॉमेडी एपिसोडमध्ये काम केलेले आहे. तसेच तिने भोजपुरी, हिंदी, पंजाबी या विविध भारतीय भाषांमधील अल्बम सॉंगमध्ये लीड रोल केलेला आहे.


अंधेरीत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस


मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अंधेरीत सुरू असलेल्या आणि महिलांद्वारे चालवल्या जाणार्‍या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. अंधेरीतील एका पॉश  एरियामध्ये सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी दोन ज्येष्ठ नागरिकांसह तीन महिलांना अटक केली होती. वेश्याव्यवसायाच्या रॅकेटची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने 5 एप्रिल रोजी या रॅकेटचा पर्दाफाश केला.


पोलिसांनी सांगितले की, संशयितांनी त्यांच्या ग्राहकांना वेश्याव्यवसायासाठी मॉडेल पुरवण्याचं काम केलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी मुंबईत एफआयआर दाखल केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला तीन संशयितांपैकी एकाने ज्योतिषी असल्याचा दावा केला होता. ती व्यक्ती देह व्यापारात गुंतलेली असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवर मुंबई पोलिसांनी तपास केला आणि 5 एप्रिलच्या रात्री सापळा रचून या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.