मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागातील महिला मोठ्या प्रमाणामध्ये कागदपत्रे घेऊन शासकीय कार्यालयात दाखल होत आहेत. योजनेतून लाभ होणार आहे एवढी एकाच माहितीवर मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील अशिक्षित महिलांनी शासकीय कार्यालयात गर्दी करायला सुरुवात केली. या योजनेसाठी नेमकी काय कागदपत्र लागतात? याची त्यांना माहिती नाही. याचाच फायदा काही चोरटे उचलत आहेत. अहमदपूर तालुक्यातील उन्नी या गावातील जिजाबाई तुकाराम गायकवाड लाडकी बहीण योजनेसाठी अहमदपूरच्या तहसील कार्यालयात दाखल झाल्या. 35 ते 40 वर्ष वयोगटातील एक व्यक्ती त्यांच्या जवळ आला. साठ रुपये द्या तुमची कागदपत्र द्या, तुमचा फोटो अधिकाऱ्यांना दाखवतो. मग योजनेचा तुम्हाला लाभ मिळेल असं सांगितलं. साठ रुपये, कागदपत्रे घेतली आणि त्यांचा फोटो काढला. फोटोमध्ये गळ्यातली सोनं आणि कानातलं सोन आलं आहे, ते मॅडमला दाखवून येतो असं सांगत त्यांच्याकडून हस्तगत केलं. हातात सोनं पडल्याबरोबर तो व्यक्ती गर्दीत गायब झाला. आपण फसलो गेलो याची जाणीव काही वेळातच जिजाबाई यांना झाली. गर्दीतील अनेक लोकांना त्यांनी झालेली फसवणूक सांगितली. मात्र फसवणूक करुन सोनं घेऊन गायब झालेला तो व्यक्ती पुन्हा काही नजरेत पडला नाही.
याची माहिती अहमदपूर पोलिसांना कळाली. अहमदपूर पोलीस सतर्क झाले आहे. अशाप्रकारे लोकांना फसवून आर्थिक लुबाडणूक करणारे लोक गर्दीचा फायदा घेत सक्रिय झाल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी आता गस्त वाढवली आहे. अहमदपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी डी भुसनूर यांनी आव्हान केले आहे की, नागरिकांनी सतर्क रहावं. सरकारनं विविध योजना राबवल्या आहेत त्याचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी सरकारी कर्मचारी यांच्याशीच संपर्क साधावा. खासगी व्यक्ती किंवा त्रयस्थ व्यक्ती माहिती देत असेल आणि त्या बदल्यात पैसे आणि इतर गोष्टी मागत असेल तर त्याच्याशी व्यवहार करू नये.. संशयास्पद काही गोष्टी वाटल्या तर तात्काळ पोलिसांना संपर्क करावा.
शासकीय योजना जाहीर झाल्यानंतर अशिक्षित आणि अडाणी लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये कागदपत्राची पूर्तता करताना अडचणीचा सामना करावा लागतो. शासकीय योजनेसाठी कोणाला भेटायचे कोणत्या कार्यालयात जायचे कोणती कागदपत्र लागणार आहेत, याची अपुरी माहिती असल्याने त्यांची फसवणूक होण्याचे प्रमाण अधिक आहे. अशी फसवणूक होऊ नये म्हणून त्या त्या कार्यालयात योग्य ती दक्षता घेण्यात आली तर लोकांची फसवणूक होणार नाही.
आणखी वाचा :