मुंबईराज्य सरकारनं 2024-25 च्या अर्थसंकल्पात विविध योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये राज्यातील युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024)जाहीर करण्यात आली आहे. या योजनेद्वारे बारावी उत्तीर्ण असलेल्या युवकांना 6 हजार रुपये, पदविका उत्तीर्ण असणाऱ्यांना 8 हजार आणि पदवी उत्तीर्ण असणाऱ्यांना 10 हजार रुपये देण्यात येणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये बोलताना या योजनेविषयी माहिती दिली. माझी लाडकी बहीण योजनेप्रमाणं (Majhi Ladki Bahin) लाडक्या भावांसाठी देखील योजना आणल्याचं त्यांनी म्हटलं. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण  या योजनेचा लाभ नेमका कुणाला मिळणार याबाबत माहिती जाणून घेणं आवश्यक आहे. 


मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे पैसे किती महिने मिळणार? 


बारावी उत्तीर्ण, आयटीआय, पदविका आणि पदवी उत्तीर्ण असणाऱ्या युवकांना त्यांनी नोंदणी केल्यानंतर या योजनेचा लाभ दिला जाईल. मात्र, ज्या उमेदवारांचं शिक्षण सुरु असेल त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. अर्ज दाखल करणाऱ्या युवकांचं वय 18 ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे. राज्य सरकार महाराष्ट्राचे रहिवासी असणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टायपेंड म्हणून रक्कम देणार आहे.  युवकांनी अर्ज दाखल केल्यानंतर राज्य सरकारकडे नोंदणी केलेल्या कंपन्यांमध्ये प्रशिक्षण दिलं जाणार आहे. युवकांना संबंधित कंपन्यांमध्ये सहा महिने प्रशिक्षण कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. युवकांना सहा महिने स्टायपेंडची रक्कम दिली जाणार आहे. 


राज्य सरकार युवकांच्या विद्यावेतनाचा खर्च करणार आहे.  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे दरवर्षी 10 लाख युवकांना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवण्यात येणार आहे.  


प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढं काय? 


युवकांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संबंधित कंपनीकडून त्यांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. संबंधित आस्थापना अथवा कंपनीला युवकाचं काम योग्य वाटल्यास त्यांना तिथं नोकरी देऊ शकतात. याशिवाय राज्य सरकार देत असलेल्या विद्या वेतनाशिवाय अधिकची रक्कम संंबंधित आस्थापना युवकांना देऊ शकतात. 


युवकांना राज्य सरकारकडून देण्यात येणारा स्टायपेंड दरमहा दिला जाणार आहे. हा स्टायपेंड सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मिळेल. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचा लाभ संबंधित युवक फक्त एकदाच घेऊ शकतो. 


संबंधित बातम्या :


Eknath Shinde on Ladka Bhau : मुख्यमंत्र्यांनी लाडक्या भावांसाठी केलेल्या घोषणेचा लाभ कसा घ्यायचा? अर्ज कुठे करायचा, कोण पात्र असणार?


Fact Check : खरंच लाडकी बहीण योजनेप्रमाणं लाडका भाऊ योजना सुरु केलीय का? बारावी पास असल्यास 6 हजार रुपये कसे मिळणार?