मीरा रोड : आईसह तिच्या चार लहान मुलांना ठार मारणाऱ्या नराधमांना अखेर गुन्हे शाखा युनिट 1 ने वाराणसीहून (Varanasi) अटक केली आहे. यूपी पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट 1 ने मिरा रोडच्या पेणकर पाडा येथे 1994 साली झालेल्या हत्याकांडातील दोन आरोपींना यूपीहून अटक करण्यात यश मिळवले आहे.
मिरा रोडच्या पेणकर पाडा (Mira Road Penkar Pada Murder Case) येथे 1994 साली एकाच कुटुंबातील चार लहान मुलं आणि आईसह 5 जणांची रहात्या घरात हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाने संपूर्ण देशभर खळबळ माजली होती. या हत्याकांडात एकाला अटक करण्यात आली होती. तर दोन आरोपी 1994 पासून फरार होते. काशिमिरा क्राईम युनिट 1 च्या टीमला हे मोठं यश मिळालं आहे.
शेजाऱ्यांसोबत वादातून हत्या
आरोपी अनिल सरोज आणि त्याचा भाऊ सुनील सरोज हे 1994 साली काशिमिरा हद्दीतील पेणकर पाडा येथील एका चाळीत राहत होते. हे दोघेही मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या शेजारी राजनारायण प्रजापती हा आपल्या कुटुंबासह राहत होता. आरोपी अनिल सरोज यांच्या सुटकेसमधून एके दिवशी 3 हजार रुपये गायब झाले. राजनारायण प्रजापती यांच्या मुलांनीच हे पैसे गायब केल्याचा अनिल सरोज यांला संशय होता. यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वारंवार वाद होत होते.
दिनांक 16-11-1994 रोजी राजनारायण प्रजापती आपल्या कामावर गेला असता अनिल सरोज आणि सुनील सरोज या दोघांनी त्यांचा आणखीन एक साथीदार कालिया चौहान उर्फ अमरनाथ चौहान या तिघांनी राजनारायण प्रजापती याची 28 वर्षीय पत्नी जागराणी प्रजापती, पाच वर्षाचा मुलगा प्रमोद, तीन वर्षाची मुलगी पिंकी, दोन वर्षाची मुलगा चिंटू आणि अवघ्या तीन महिन्याचा मुलगा पिंटू यांच्यावर त्यांच्या राहत्या घरात चाकू आणि चॉपरने वार करत निघृण हत्या केली होती. या घटनेनं संपूर्ण देशभर खळबळ माजली होती.
आरोपी देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी पसार
हत्याकांडानंतर अनिल सरोज आणि सुनील सरोज हे दोघे दिल्लीला पळून गेले होते. तर तिसरा आरोपी कालिया चौहान हा दुबईला निघून गेला होता. दोघे दिल्लीत बरेच दिवस छुप्या पद्धतीने काम करू लागले होते. 2009 मध्ये दोन्ही भाऊ यूपीच्या जौनपूर येथील सोहनी गावात आपली नावे आणि पोशाख बदलून राहू लागले होते. दोघेही त्यांच्या मूळ गावी येत-जात नव्हते. त्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नव्हती. अनिल सरोज हा तांत्रिक पूजा करत होता आणि दोघे भाऊ दिनांक 7 ऑक्टोंबर रोजी उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथील सारंगनाथ मंदिरात पूजेसाठी येणार असल्याची माहिती क्राईम युनिट 1 ला मिळाली त्यांनी यूपीच्या स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने वाराणसी येथून दोघांना अटक केली आहे.
कालिया चौहान उर्फ अमरनाथ चौहान याला पोलिसांनी सप्टेंबर 2022 मध्ये दुबईहून येताना मुंबई एअरपोर्टवरुन अटक केली होती. परंतु अनिल सरोज आणि सुनील सरोज हे 1994 पासून फरार होते. मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांना त्यांच्याबद्दल कोणताही सुगावा लागू शकला नव्हता. मात्र एक इन्फ़ॉर्मेशन मिळाली आणि तब्बल 30 वर्षानंतर दोघांना अटक करण्यात यश मिळालं.
ही बातमी वाचा: