Hydrabad Gang Rape Case : हैदराबादमध्ये एका अल्पवयीन मुलीवर मर्सिडीज कारमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपींमध्ये अनेक बड्या नावांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणात पोलिसांकडून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. हैदराबादमधील उच्चभ्रू वस्ती जुबली हिल्समध्ये एका 17 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 


या प्रकरणात तीन ते चार आरोपींचा समावेश असल्याचं प्राथमिक तपासात उघडकीस आलं आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. तसेच इतर आरोपींमध्ये आमदाराच्या मुलाचाही समावेश असल्याचं बोललं जात आहे. पीडित मुलीच्या वडीलांच्या पिर्यादीवरून पोलिसांनी तक्रार दाखल केली असून सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पोलिसांकडून या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.


बुधवारी जुबली हिल्स पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या हायप्रोफाईल गुन्ह्यासंदर्भात पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आहे. ही घटना शनिवारी घडल्याचं समोर येत आहे. प्राथमिक माहितीनंतर पोलिसांनी तीन जणांविरुद्ध भांदवि कलम 376, 354, 323, 09, 10, आणि पॉक्सो कायदा 2012 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 17 वर्षीय पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे


पीडितेकडून एका आरोपी ओळख पटली
मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता तिच्या मैत्रिणीच्या एका पार्टीत सहभागी होण्यासाठी गेली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेसोबत पार्टीमध्ये एका आमदाराचा मुलगा आणि अल्पसंख्याक मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते. सध्या पीडितेने फक्त एका आरोपीची ओळख पटवून त्याचं नाव सांगितलं आहे. हा आरोपीही अल्पवयीन असल्याचं सांगण्यात येत आहे.






गुन्हेगारांना कोण संरक्षण देतंय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींमध्ये तीन राजकारण्यांच्या मुलांचा समावेश आहे. त्यापैकी एक एआयएमआयएम (AIMIM) नेत्याचा मुलगा आहे, दुसरा टीआरएस (TRS) नेत्याचा मुलगा आहे आणि तिसरा काँग्रेस (Congress) नेत्याचा मुलगा आहे.


आरोपींमध्ये एक आरोपी आमदाराचा मुलाचा तर दुसरा आरोपी राज्य सरकारी मंडळाच्या अध्यक्षाचा मुलगा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर तिसरा आरोपी हा विरोधी पक्षांमध्ये सहभागी असलेल्या एका नेत्याचा मुलगा आहे. दुसरीकडे, आरोपींबाबत पोलिसांनी सांगितलं की, आरोपी अल्पवयीन आहेत, त्यामुळे त्यांची नावं उघड करू शकत नाहीत. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या राजकीय दबावामुळे पोलीस ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.


28 मे रोजी घडली घटना
पीडितेच्या वडिलांनी जुबली हिल्स पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरनुसार, 28 मे रोजी त्यांची मुलगी एका पार्टीला गेली होती. अॅम्नेशिया अँड इन्सोम्निया पब, रोड नंबर 36, जुबली हिल्स इथे मुलीचे मित्र सूरज आणि हादी यांनी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. ज्यासाठी तिला आमंत्रित केलं होतं.


पीडितेच्या वडिलांनी सांगितलं की, संध्याकाळी 5.30 च्या सुमारास काही लोक माझ्या मुलीला लाल रंगाच्या मर्सिडीज कारमधून पबच्या बाहेर घेऊन गेले. यादरम्यान एक इनोव्हा कारही बाहेर आली. कारमधील लोकांनी माझ्या मुलीशी गैरवर्तन केलं. तेव्हापासून माझी मुलगी शॉकमध्ये आहे. सध्या तिच्या संपूर्ण घटनेचा खुलासा करू शकलेली नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या