मथुरा: उत्तर प्रदेशमधील मथुरेमधून (Mathura Murder) एक खळबजनक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरुनं लग्नाच्या मांडवात जाऊन नवरी मुलीला गोळ्या घालून मारल्याची घटना समोर आली आहे. लग्नाला अवघे काही क्षण बाकी असताना नवरीला आपला जीव गमावावा लागला आहे. विवाह समारंभामध्ये घुसत एकतर्फी प्रेम करणाऱ्या युवकानं नवरी मुलीला गोळ्या घातल्या. मथुरा जिल्ह्यातील नौझील गावात ही घटना घडली आहे. मृत तरुणीचं नाव काजल असं आहे. घटनेनंतर आरोपी अनीश फरार झाला मात्र नंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
नवरीच्या रुममध्ये जात युवकाचा गोळीबार
मथुरेमधील मुबारकपूर येथील रहिवाशी खुबीराम यांची मुलगी काजलचं लग्न नोयडाच्या एका युवकासोबत ठरलं. गुरुवारी वाजत गाजत नवरदेवाची वरात खुबीराम यांच्या घरी पोहोचली. लग्नाच्या निमित्तानं उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण होतं. सनई चौघडे वाजत होते. लग्नातील सर्व प्रकारचे विधी सुरुळीत सुरु होते. वरमाला देखील वधूवरांनी एकमेकांना घातल्या होत्या. सात फेऱ्या घालण्याचा विधी बाकी होता. या सात फेऱ्यांची तयारी करण्यासाठी नवरी तिच्या रुममध्ये गेली. याचवेळी अनीश तिच्या रुममध्ये घुसला आणि त्यानं काजलवर गोळी झाडली.
अनीश झाडलेली गोळी काजलच्या डोळ्याजवळ लागली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी अनीश घटनास्थळावरुन फरार झाला. क्षणात लग्नाच्या मांडवातील माहोल बदलला. जिथं सनईचे सूर सुरु होते तिथलं वातावरण शोकाकुल झालं. घटनेनंतर नवरदेव आणि त्याच्याकडील मंडळी आपल्या घरी निघून गेली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर एसपी (ग्रामीण) शिरीश चंद्र यांच्या नेतृत्वात पोलिसांनी फरार आरोपी अनीशचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या.
अनीश हा काजलला गेल्या काही महिन्यांपासून परेशान करत असल्याची माहिती काजलचे वडील खुबीराम यांनी पोलिसांना दिली.