पालघर : लग्न जमल्यानंतर कुंकू लावण्याच्या कार्यक्रमात ब्रँडेड कुंकू वापरले नसल्याचे कारण देऊन चक्क लग्न मोडण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी लग्न मोडणारा नवरा मुलगा त्याचे आई-वडील व त्याच्या काका विरोधात पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका पोलीस स्टेशनमध्ये भादंवी कलम 420, 417, 500, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी तालुक्यातील घोटगाव येथील मूळ रहिवासी असणारे सुदाम उर्फ सुधाकर विठ्ठल पाटील, सध्या मुक्काम वसई यांनी त्यांच्या सिव्हिल इंजिनिअर असणाऱ्या मुलाचे लग्न वाडा तालुक्यातील एका सुसंस्कृत कुटुंबातील उच्चशिक्षित मुलीबरोबर ठरवले होते. हे लग्न जमवण्यासाठी सदर मुलाचे काका व महसूल विभागात असणारे कमलाकर विठ्ठल पाटील यांनी पुढाकार घेतला होता. त्या अनुषंगाने हे लग्न जमल्यानंतर 30 ते 40 लोकांच्या उपस्थितीत टीळा लावण्याचा अर्थात एंगेजमेंट करण्याचा कार्यक्रम पार पडला होता.
यावेळी नवऱ्याकडील मंडळींचे नवरी मुलीच्या वडिलांनी येथोचित असे त्यांचे आगत-स्वागत केले होते. तसेच कपड्यांच्या भेटी दिल्या, साग्रसंगीत जेवण झालं. मात्र, दुसऱ्या दिवशी साखरपुड्याची तारीख ठरविण्यासाठी नवरी मुलीच्या वडिलांनी नवऱ्या मुलाला व त्याच्या काकांना विचारणा केली असता मुलांनी त्यांना चक्क आपलं जमणार नसल्याचं कारण सांगितलं. यानंतर नवरीच्या वडिलांनी मुलाच्या काकांना फोन करून कारण विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, काका कमलाकर पाटील याने फोन न उचलता तसेच कोणताही प्रतिसाद दिला नाही, अशी नवरीकडच्या मंडळींनी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांसमोर दिली आहे.